लोणावळ्याचं भुशी धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात

| Updated on: Jul 06, 2019 | 7:35 PM

पावसाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील पाहायला मिळत आहे.

लोणावळ्याचं भुशी धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात
Follow us on

पुणे : पावसाळ्यात लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असणारं भुशी धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेल्या या धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मागील चार दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे लोणावळ्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.

पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. पावसाने दमदार हजेरी लावल्याने भुशी धरण ओसंडून वाहू लागलं. मुंबई-पुणे या द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. यंदा धरण लवकरच भरल्याने पर्यटकांना चांगलीच ट्रिट मिळाली.

धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसतात. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने आतापंर्यंत 600 मीमी पावसाची नोंद लोणावळ्यात झाली आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर भुशी धरणावर फेरफटका मारण्यासाठी येत आहेत.

या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये धरणाच्या पायर्‍यांवर बसून पावसात चिंब भिजण्याचा आनंद, तसेच फोटोची क्रेझ देखील पाहायला मिळते. धरणाच्या पाणीपातळीत झालेली वाढ स्थानिक विक्रेत्यांना सुखावणारी आहे. पावसाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.