Pune Lockdown | पुणे छावणी परिसर 2 दिवस पूर्ण लॉकडाऊन, मेडिकल वगळता सर्व बंद

कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुण्यातील कॅन्टोनमेंट भागात (पुणे छावणी) चांगलंच थैमान घातलं आहे (Complete Lockdown in Pune Cantonment Area).

Pune Lockdown | पुणे छावणी परिसर 2 दिवस पूर्ण लॉकडाऊन, मेडिकल वगळता सर्व बंद

पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुण्यातील कॅन्टोनमेंट भागात (पुणे छावणी) चांगलंच थैमान घातलं आहे (Complete Lockdown in Pune Cantonment Area). या परिसरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन अखेर प्रशासनाने या ठिकाणी 2 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे कॅन्टोनमेंट हद्दीत 9 मे आणि 10 मे या दोन दिवशी पूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. कॅन्टोनमेंट बोर्डच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे छावणी हद्दीत आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत या ठिकाणी एका ज्येष्ठ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 6 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या एकूण 49 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कॅन्टोनमेंट परिसरात मोदीखाना परिसर, घोरपुरी, फातिमानगर, सोलापूर बाजार, दस्तुर मेहेर रोड आणि भीमपुरा या भागात लॉकडाऊन करण्यात येईल. त्यामुळे या परिसरात फक्त मेडिकल दुकानं सुरु राहतील. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 2,300 हून अधिक झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्कपणे काम करत आहेत.

पुणे मनपानं कंटेनमेंट भाग वगळता इतर भागातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे शहरातील साधारण 97 टक्के भाग खुला झालाय. अशा परिस्थितीत पुणे कॅन्टोनमेट बोर्डानं खबरदारीचा उपाय म्हणून कॅन्टोनमेंट हद्दीत 2 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत इथं फक्त मेडिकल दुकान सुरु राहतील. त्यामुळं दूध, भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही बंद राहतील. कॅन्टोनमेंट हद्दीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅन्टोनमेंट बोर्डच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी याबाबतचा आदेश पारित केला आहे. नागरिकांनी या लॉकडाउनचं पालन करावं, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकाच्या सदस्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चा केली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे आणि आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पथकाचे प्रमुख आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक डॉ. सुधीर गुप्ता यांनी केल्या.

डॉ. गुप्ता म्हणाले, “केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा व माहिती घेणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची रुग्णालये, ससून, भारती हॉस्पिटल आदी कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करणार आहोत.” यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती रुग्ण संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक उप महासंचालक डॉ. मानस रॉय, वरिष्ठ क्षेत्रीय संचालक डॉ. अरविंद अलोणे उपस्थित होते. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आर.एस. आडकेकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

पुण्यात दारुच्या 107 दुकानांना पुन्हा टाळे

Pune Corona | कोरोनामुक्त बाळंतीण 21 दिवसांनी घरी, दोन वृद्धांचीही मात

अजित पवारांच्या नेतृत्वात पुण्यात काम होत नाही का? महापौरांचा विरोधकांना सवाल

Complete Lockdown in Pune Cantonment Area

Published On - 4:11 pm, Fri, 8 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI