काश्मीरसाठी बजेट नाही? चिखलदऱ्याला जा, काश्मीरचा फिल घ्या!

काश्मीरसाठी बजेट नाही? चिखलदऱ्याला जा, काश्मीरचा फिल घ्या!

अमरावती: सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेल्या अमरावतीच्या  चिखलदऱ्याचे सौंदर्य  सध्या बहरलं आहे. विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात सध्या पर्यटकांचा ओघ सुरु आहे. हिरव्यागार पर्वतरांगा, श्वास रोखायला लावणाऱ्या दऱ्या, मन मोहून टाकणारी विविध रंगांची फुले आणि यासोबतच थंडगार, आल्हाददायक हवेमुळे चिखलदरा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

दाट धुके, हिरवा शालू नेसलेला निसर्ग आणि डोंगर दऱ्यातून कोसळत असलेल्या धबधब्याचा आनंद लुटण्याकरिता पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सातपुडा पर्वत रांगात वसलेल्या  चिखलदऱ्याचे सौंदर्य हिवाळयात आणि पावसाळ्यात अधिकच बहरून येते. दाट धुक्यातील चिखलदरा पर्यटकांना काश्मीरची आठवण करुन दिल्याशिवाय राहत नाही.

पर्यटकांच्या सोयीकरिता इंग्रजकाळात येथील अनेक पॉईंट विकसित करण्यात आले आहेत. येथील देवी पॉईंट, गाविलगड, पंचगोल, भीमकुंड आणि अन्य ठिकाणी राज्याच्या अनेक भागातून  आलेले पर्यटक मोठया प्रमाणावर गर्दी करत आहेत. अमरावतीपासून 80 किमी अंतरावर असलेल्या चिखलदराला  विदर्भाचं काश्मीर संबोधलं जातं. थंडगार वारं, गुलाबी थंडी जणू काश्मीरचा फिल देतं. त्यासाठीच राज्यासह राज्याबाहेरील पर्यटक इथे गर्दी करु लागले आहेत.

चिखलदऱ्याने निसर्गाची हिरवी चादर ओढली की काय असे चित्र सध्या दिसत आहे. चिखलदऱ्यात एकूण नऊ दऱ्या आहेत. या सर्वठिकणी सध्या मोठी गर्दी आहे.

उंचकड्यावरुन खोल दरीत कोसळणारा धबधबा साक्षात निसर्ग सौंदर्याचे रुप दाखवतो. तसंच भीमकुंडदेवी कुंड सध्या पर्यटकांना खुणावतोय. भीमकुंडाच्या धारा तीन हजार फूट खोल दरीत कोसळत आहेत. हा आल्हाददायक अनुभव घेण्यासाठी आणि काश्मीरचा फिल अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा चिखलदऱ्याला नक्की भेट द्या.

चिखलदऱ्यात हे नक्की पाहा

सातपुडा पर्वत रांग

देवी पॉईंट

गाविलगड

पंचगोल

भीमकुंड धबधबा

चिखलदऱ्याला कसं पोहोचायचं?

चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावतीत पोहोचल्यानंतर तिथून खासगी वाहने किंवा एसटी बसने तुम्ही चिखलदऱ्याला जाऊ शकता. अमरावती स्टेशनपासून चिखलदरा सुमारे 80 किमी आहे. अमरावतीतून चिखलदऱ्यात पोहोचण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास वेळ लागू शकतो.

 

Published On - 12:57 pm, Wed, 19 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI