नवरा-बायकोला विवस्त्र केलं, पेट्रोल टाकून अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी दाम्पत्याला विवस्त्र करुन मारहाण केल्याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरा-बायकोला विवस्त्र केलं, पेट्रोल टाकून अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

अहमदनगर : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी अहमदनगरमध्ये एका दाम्पत्याला विवस्त्र करुन अंगावर पेट्रोल टाकून अमानुष मारहाण झाली. यानंतर सोमवारी (2 मार्च) रात्री उशिरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (FIR in Ahmednagar rape victim beating). या घटनेने राज्यभरात एकच खळबळ माजली आणि गुंडांना कायद्याचा धाक राहिला की नाही असाच प्रश्न उपस्थित झाला. विरोधीपक्षांनी देखील सरकारला धारेवर धरले. अखेर अहमदनगर तोफखाना पोलिसांनी या प्रकरणात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे आरोपींनी पीडित दाम्पत्याला याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर विवस्त्र करुन केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करु, बदनामी करु अशी धमकीही दिली होती. पीडित महिलेच्या नवऱ्याला जबरदस्तीने वीर्य देण्यास सांगून त्याच्याचविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, करु अशीही धमकी आरोपींनी दिल्याची माहिती पीडितांनी दिली आहे. यात पोलिसांचाही समावेश असल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे. त्यामुळे पीडितांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोपींकडून पीडितांचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल

पीडित पती-पत्नीने आरोपींना त्यांच्याविरोधात तक्रार करणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतरच आरोपींनी पीडितांना सोडलं. मारहाणीचा हा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत पीडितांना विवस्त्र करुन त्यांचे हात मागे बांधल्याचं दिसत आहे. तसेच त्याचं तोंडही बंद करण्यात आलं आहे. संबंधित व्हिडीओत पीडितांना पट्ट्याने मारहाण होताना दिसत आहे. असं असलं तरी पोलिस या व्हिडीओचाही तपास करत आहेत.

प्रकरण काय आहे?

अहमदनगरमध्ये 2016 मध्ये पीडित विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. यात 6 आरोपींचा समावेश आहे. मात्र, 4 वर्षे होऊनही अद्याप या प्रकरणात आरोपपत्रही दाखल झालेलं नाही. विशेष म्हणजे बलात्कारातील हे आरोपी सध्या जामिनावर बाहेर असून त्यांनी आपल्याविरोधातील गुन्हा मागे घेतला जावा यासाठी वारंवार पीडितांवर अत्याचार केले.

पीडित दाम्पत्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विशेष म्हणजे पीडितांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत याआधीही त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. 24 जानेवारीला पीडित दाम्पत्य शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन घरी जात होते. तेव्हा त्यांचं रुग्णालयाच्या बाहेरच अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना एका अज्ञातस्थळी बंदिस्त खोलीत विवस्त्र करण्यात आलं. त्यांच्याच कपड्यांच्या सहाय्याने त्यांना उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याचीही माहिती पीडितांनी दिली आहे. वारंवार तक्रार मागे घेण्यासाठी पीडितांवर होत असलेल्या या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता तरी जागे होणार का? पीडितांना पोलीस संरक्षण देणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीत काय?

आरोपींमध्ये अर्जून साहेबराव वाघ, तुषार वाघ, बंडू हिराजी मतकर, अरुण नबाजी मतकर, हिराजी त्रंबक मतकर, सुभाष श्रीकृष्ण कराळे, दिलीप मच्छिंद्र नगरे, रंगा जाधव यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त स्वतःला पोलिस असल्याचं सांगणाऱ्या दोन अनोळखींचाही या गुन्ह्यात समावेश असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोनदा पीडितांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

पीडितेने म्हणणं काय?

“आम्ही 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथून रिक्षाने निघाली होतो. त्यावेळी रिक्षात एक अनोळखी व्यक्ती बसला. रिक्षा थोडी पुढे गेल्यावर त्याने आमच्या नाकाला काहीतरी हुंगवून बेशुद्ध केलं. त्यानंतर एका अज्ञात स्थळी नेऊन खोलीत बंद केलं. त्याठिकाणी ओळखीचे 8 लोक आणि पोलीस म्हणून घेणाऱ्या 2 अनोळखी व्यक्तींनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही पोलिसांच्या नादी लागता काय असं म्हणून आमच्या अंगावरील कपडे काढून विवस्त्र केलं. आमच्या अंगावर पेट्रोल टाकून पट्ट्याने मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.”

“आरोपींनी मारहाण करताना आम्हाला उलटं लटकवलं आणि तुम्ही कोणत्याही केसला न्यायालयात हजर होऊ नका, आम्ही मारहाण केल्याची तक्रार करु नका, असं सांगितलं. आमच्या हिवरकर साहेबांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेला नसता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. तुम्ही हिवरकर साहेबांच्या विरोधात तक्रार दिली तर आम्ही रेकॉर्डिंग करत आहोत. तुच येथे येऊन बलात्कार केला म्हणून आम्ही मारहाण केल्याचं सांगू अशी धमकी आरोपींनी दिली. 26 फेब्रुवारी रोजी आरोपी दिगंबर कराळे याने आम्हाला फोन करुन आधीच्या केसमधून माझं नाव काढून टाक मी तुला 24 फेब्रुवारीच्या घटनेचा व्हिडिओ देतो असं म्हटलं”, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक मुलाणी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ :


FIR in Ahmednagar rape victim beating

Published On - 8:13 am, Tue, 3 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI