घरच्या घरी विसर्जन, ना मिरवणूक, ना गर्दी, गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत (Guidelines issued by CM Uddhav Thackeray for Ganeshotsav 2020).

घरच्या घरी विसर्जन, ना मिरवणूक, ना गर्दी, गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत (Guidelines issued by CM Uddhav Thackeray for Ganeshotsav 2020). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर मार्गदर्शक सूचनांबाबत माहिती दिली. राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी 12 मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये घरगुती गणपतीपासून ते सार्वजनिक गणपती मंडळ यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत (Guidelines issued by CM Uddhav Thackeray for Ganeshotsav 2020).

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या 12 गाईडलाईन्स

1) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

2) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

3) कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच न्यायालयाने निर्गित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

4) गणरायाची मूर्ती सार्वजनिक मंडपाकरिता 4 फूट आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटाच्या मर्यादित असावी.

5) यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

6) उत्साकरिता देणगी किंवा वर्गणी स्वच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पहावे. तसेच आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

7) सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींची उंची 4 फुटांपर्यंतच, मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 10 सूचना

8) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबिरे (उदा. रक्तदान शिबिर) आयोजित करण्यास प्रधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

9) आरती, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषण संदर्भातील नियमांचे आणि तरतुदींचे पालन करण्यात यावे.

10) गणरायाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था व्यवस्था करण्यात यावी.

11) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे. तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छेने नियम पाळले जाईल, याकडे लक्ष देण्यात यावे.

12) गणरायांच्या आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

हेही वाचा : प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

Published On - 7:16 pm, Fri, 17 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI