हर्षवर्धन पाटील यांचं ‘ठरलंय’, संकल्प मेळावा बोलावला!

हर्षवर्धन पाटील यांचं 'ठरलंय', संकल्प मेळावा बोलावला!

राज्याचे माजी सहकारमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

सचिन पाटील

|

Sep 02, 2019 | 11:19 AM

पुणे:  राज्याचे माजी सहकारमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. इंदापूरच्या उमेदवारीबाबत आघाडीकडून कोणताच निर्णय झालेला नसल्याने आणि उमेदवारी मिळण्याबाबत संदिग्धता असल्यानं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना वेगळा निर्णय घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर बुधवारी  4 सप्टेंबर रोजी इंदापूरमध्ये संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत इंदापूरची जागा काँग्रेसकडे होती. मात्र त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यात इंदापूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांचा विजय झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अनेकदा काहीही झालं तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती.

त्यामुळं लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासह जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन समेट घडवला. त्यामुळं इंदापूरमध्ये अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी एकत्रित सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचं दाखवलं.

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी किंवा आघाडीकडून इंदापूरच्या जागेबाबत निर्णय जाहीर होईल अशी शक्यता होती. मात्र तसं काहीच घडत नसल्यानं अखेर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याचा आग्रह केला.

त्यानुसार बुधवारी दि. 4 सप्टेंबर रोजी इंदापूरमध्ये संकल्प मेळावा होणार आहे. यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

 मागील काही काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील हेही भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करूनच पुढील निर्णय घेण्याची भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी घेतली. त्यामुळं त्यांच्या पक्षांतराच्या निर्णयाबद्दल बुधवारीच फैसला होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें