सांगलीत मुसळधार, कृष्णेची पातळी 34 फुटांवर, 12 राज्य मार्ग आणि 59 जिल्हा मार्ग खंडित

अक्षय चोरगे

|

Updated on: Oct 15, 2020 | 4:32 PM

गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे, सोबतच कोयना धारणातून पाण्याचा विसर्गही सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

सांगलीत मुसळधार, कृष्णेची पातळी 34 फुटांवर, 12 राज्य मार्ग आणि 59 जिल्हा मार्ग खंडित
सांगली : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 25 पूल पाण्याखाली गेले आहेत. तर तब्बल 18 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.

सांगली : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे, सोबतच कोयना धारणातून पाण्याचा विसर्गही सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगली शहरा जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. (Heavy rain in Sangli – water level of Krishna river on 34 feet, flood disrupted 12 state roads and 59 district roads)

सांगली शहरातील कर्नाळ रोड वर पाणी साचले असून शहरातील काका नगर, सुर्यवंशी प्लॉट, जगदंब चौक, भीम नगर येथील घारांमध्ये पाणी शिरले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने 200 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान औदुंबर येथील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 12 राज्य मार्ग आणि 59 जिल्हा मार्ग खंडित झाले आहेत.

सांगलीत 25 पूल पाण्याखाली, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 25 पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून मिरज पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

साताऱ्यातही अतिवृष्टी

सातारा जिल्हयातही रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे माण, खटाव, फलटण, वाई, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये नदी-नाले आणि तलाव भरुन वाहू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. मात्र, कालपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. परिणामी सातारा येथील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्रीपासून वीर, उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून नदीपात्रात मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

वीर धरणातुन रात्री 23,185 क्युसेक,उरमोडी धरणातुन रात्री 1900 क्युसेक तर कण्हेर धरणातील दोन वक्रदरवाजातुन रात्री 1750 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच म्हसवड भागात माण नदीला पूर आला आहे. याठिकाणी नदीने धोकादायक पातळी ओलांडली असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे म्हसवड-आटपाडी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर माण-खटाव तालुक्यातही मुसळधार पावसामुळे बंधारे भरुन वाहू लागले आहेत

कोल्हापुरातही मुसळधार पाऊस; पंचगंगेच्या पातळीत मोठी वाढ

राज्याच्या इतर भागांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी रात्रभर तब्बल सहा फुटांनी वाढली. त्यामुळे सध्या पंचगंगा नदीने 17फुटांची पातळी गाठली आहे. आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस असाच सुरु राहिल्यास पंचगंगेच्या काठावर असलेल्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबादमध्ये पावासाचा हाहा:कार; पाझर तलाव फुटले

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसांनंतर पुराचा हाहाकार समोर आला असून दोन पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले. तर परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला. पुरात व पाण्यात अडकलेल्या 84 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. बेडगा येथील 2 , गुंजोटी 3 , राजेगाव 6 तर काळेवाडीतील 70 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. उमरगा तालुक्यातील कदेर येथील अडकलेल्या दोन जणांना एअरलिफ्ट करून वाचवण्यात आले.

(Heavy rain in Sangli – water level of Krishna river on 34 feet, flood disrupted 12 state roads and 59 district roads)

संबंधित बातम्या

विठुरायाच्या पंढरीलाही पुराचा वेढा!, सहा हजार नागरिकांचं स्थलांतर होणार

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह राज्यभर रेड अलर्ट, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

साताऱ्यात रात्रभर मुसळधार पाऊस, नदीनाल्यांना पूर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत रात्रभरात सहा फुटांची वाढ

Maharashtra Rain LIVE | राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI