महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचं संकट, पंतप्रधान मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 44 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचं संकट, पंतप्रधान मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन
PM Narendra Modi

नवी दिल्ली : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 44 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक नद्यांना पूर आले असून पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. राज्यावरील या ओल्या दुष्काळाकडे अखेर केंद्र सरकारचं लक्ष गेलं आहे. राज्यातील पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. (Heay rain in Maharashtra and Karnataka, PM Narendra Modi assured CM Uddhav Thackeray and B S Yeddyurappa for all possible help)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील पूर आणि अतिवृष्टीबाबत चर्चा केली. मी पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत आहे. राज्यात सुरु असलेल्या मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन दिले आहे”.

महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातही शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशीदेखील बातचित केली आहे. मोदींनी याबाबत ट्विट केलं आहे की, “कर्नाटकमधील विविध भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबाबत मी आज मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार कर्नाटकातील पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत आहे. राज्यात सुरु असलेल्या मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन त्यांना दिले आहे”.

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव सुरु आहे. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 44 जणांनी गमावला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीदरम्यान पुणे विभागात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला.

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन आलेल्या पुरामुळे 2300 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांमधील 21 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, कर्नाटकमधील बेळगाव, कलबुर्गी, रायचुर, यादगिर, कोप्पल, गोदाग, धारवाड, बागलकोट, विजयपुरा आणि हावेरी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी बुधवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याशीदेखील चर्चा केली. या राज्यांमध्येदेखील मुसळधार पाऊस सुरु आहे. तिथेदेखील काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदींनी राव आणि रेड्डी या दोन्ही मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

संबंधित बातम्या :

मुसळधार पावसानं वाहून गेला पूल, पावसाचं रौद्र रुप दाखवणारे भीषण PHOTOS

‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा’, स्वाभिमानी युवती आघाडीचा रास्तारोको

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 44जणांनी जीव गमावला

(Heay rain in Maharashtra and Karnataka, PM Narendra Modi assured CM Uddhav Thackeray and B S Yeddyurappa for all possible help)

Published On - 11:56 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI