पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह

पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी, असं काही जणांचं मत आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला थारा देणं थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरुपाची चर्चा होऊ शकत नाही, असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह

कालका (हरियाणा) : पाकिस्तान (Pakistan) दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही बोलणी होणार नाही. आता चर्चा व्हायची असेल, तर ती फक्त आणि फक्त पाकव्याप्त काश्मीर (PoK) या एकाच विषयावर होईल, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला दरडावलं आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काल्कामध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते.

‘कलम 370 (Article 370) आणि 35 ए (Article 35A) हटवल्यानंतर आमचा एक शेजारी बिथरला आहे. जगभरातील सर्व देशांचे दरवाजे तो ठोठावत आहे. पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी, असं काही जणांचं मत आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला थारा देणं थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरुपाची चर्चा होऊ शकत नाही’ असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

‘भाजप केवळ सरकार बनवण्यासाठी नाही, तर देश बनवण्यासाठी राजकारण करत आहे. मोदींच्या नेतृत्वात कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी, तसंच स्थानिक युवकांच्या भविष्याचा विचार करता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे’ असं राजनाथ यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

‘भारत बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. याचा अर्थ भारताने बालाकोटमध्ये हल्ला केला होता, हे पाकिस्तानला मान्य आहे’ असं म्हणत राजनाथ यांनी बालाकोट एअरस्ट्राईकचा उल्लेख केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI