नागपुरात श्रीमंत महिलांच्या जुगार अड्ड्यावर धाड

नागपुरात श्रीमंत महिलांच्या जुगार अड्ड्यावर धाड

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात पुरुषांच्या जुगार अड्ड्यांवर कारवाई होणे यात काही नवीन नाही. अशा जुगार अड्ड्यांवर पोलीस नेहमीच कारवाई करत असतात. मात्र, यावेळी नागपूर पोलिसांनी चक्क महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. जरिपटका पोलिसांनी एका हायप्रोफाईल महिलांच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. याप्रकरणी पोलिसांनी चार श्रीमंत महिलांना अटक केली.

नागपुरातील जरिपटका पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तोटिया चौकात एका इमारतीत महिलांचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि चार महिलांना जुगार खेळत असताना रंगेहाथ अटक केली. तर यावेळी दोन महिला खिडकीतून पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. या जुगार अड्ड्यावरुन पोलिसांनी 30 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

तोटिया चौकातील या इमारतीत गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरु होता. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत या महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला.

नागपूर पोलिसांनी यापूर्वी अनेकवेळा पुरुषांच्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली आहे. मात्र, महिलांच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत कारवाई करणे, हे नागपुरात पहिल्यांदाच घडलं आहे. नागपूर पोलिसांच्या या कारवाईने उच्चभ्रू इमारतीत अशाप्रकारे जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.