‘कौन बनेगा करोडपती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'कौन बनेगा करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC). येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या 11 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सोनी टेलिव्हिजन वाहिनीने या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची नुकतीच घोषणा केली आहे. येत्या 1 मे पासून या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अकराव्या पर्वाचे होस्ट बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. नुकतेच सोनी टेलिव्हीजन वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या 11 व्या पर्वाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खुद्द अमिताभ बच्चन प्रेक्षकांना प्रोत्साहन देत आहेत. गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी व्हायचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अमिताभ सल्ला देत आहे. ‘आशा सोडू नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा’ असे अमिताभ बच्चन त्या महिलेला सांगत आहेत.

“अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी”, अशी या नव्या पर्वाची टॅग लाईन आहे. या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन 1 मे पासून सुरु होत आहे. त्याशिवाय बॉलिवूडचे शहेनशाहा अमिताभ बच्चन यांनीही हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं ट्वीट केलं आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला 2000 या वर्षापासून सुरुवात झाली. या कार्यक्रमामुळे छोट्या-छोट्या गावातील स्पर्धकांची स्वप्न साकार झालीत. केबीसीला यंदा 19 वर्ष पूर्ण होणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI