कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ एकदा खायलाच हवी!

कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ एकदा खायलाच हवी!

कोल्हापूर : तुम्ही देशात काय जगात कुठेही जा, पण या भेळची चव आणि सर कुठेच येणार नाही. ही भेळ सुरु होऊन आता 55 वर्ष होतील. ही चव आहे तशीच आहे. कारण या चवीमागे आहे अपार कष्ट. भेळ काय कोठेही मिळेल, पण चव जी म्हणतात, ती फक्त आमच्या भेळेलाच असेल. हा शब्द टिकवत गेली 55 वर्षे लोकांच्या जिभेवर टिकून राहिलेली आहे.

कोल्हापुरात राजाभाऊंच्या या भेळेची सुरवात 55 वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीला हातगाडीवरच्या कष्टाच्या व्यवसायालाही भेळेमुळे वेगळी प्रतिष्ठा मिळाली. प्राप्तिकर भरणारा भेळवाला म्हणून तर त्यांची नोंद झाली आहे. पण कष्टाने आणि कमीपणा कधीच मानला नाही. राजाभाऊ मनापासून भेळ बनवत असत, आज राजाभाऊ हयात नाहीत. पण त्यांचे चिरंजीव रवींद्र ऊर्फ बापू यांनी भेळेची परंपरागत चव जपली आहे.

राजाभाऊ शिंदे यांनी 1964 मध्ये खांद्याला डबे आणि त्यातून चिरमुरे, भडंग विकण्याचा व्यवसाय मंगळवार पेठेत राधाकृष्ण तरुण मंदिराजवळ सुरू केला. गरिबीमुळे कुटुंब चालवायला हाच मार्ग त्या क्षणी आवश्‍यक होता. हे करता करता 1965 मध्ये भाऊसिंगजी रोडवर गुजरी कॉर्नरसमोर त्यांनी भेळेची गाडी सुरू केली.

राजाभाऊंना त्यावेळी तुम्ही मराठे, तुम्ही शिंदे खानदानातले आणि भेळेची गाडी कसली चालवता, असे म्हणणारेही होतेच. पण कष्ट करताना दुसरा काय म्हणेल म्हणून आपण लाजायचे नसतं. हे ध्यानात ठेवून राजाभाऊंनी भेळेच्या गाडीवरच्या भेळीला चव दिली.

राजाभाऊंनी जवळजवळ 30 वर्षे त्यांची ही भेळेची गाडी गुजरी कॉर्नरला, तेथून पुढे दहा वर्षे भवानी मंडपाच्या कमानीजवळ आणि मागील 10 वर्षे केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ आताच्या खाऊ गल्लीत स्थिरावली. 3 पिढ्यांचे ग्राहक या भेळला आहेत. कितीही गर्दी असू दे, भेळेला चव कायम आहे.

हे करताना भेळेला लागणारे साहित्य चांगल्याच दर्जाचे आणि चटणी घरात तयार केलेलीच, हे तत्त्व पाळले. पूर्वी पहाटे दोनपर्यंत ही भेळ चालू राहायची, आता रात्री अकरापर्यंत आहे.

राजाभाऊंच्या भेळेच्या गाडीवर 35 वर्षांपूर्वी प्राप्तिकरची ‘धाड’ पडली. शंभर रुपयांची मोड मागण्याच्या निमित्ताने पथक आले आणि मोड घेतल्यावर आपण “प्राप्तिकर’वाले असल्याचे त्यांनी राजाभाऊंना सांगितले. राजाभाऊंना प्राप्तिकर म्हणजे काय हेच समजत नव्हते.

राजाभाऊ अधिकाऱ्यांना म्हणाले, रात्री 2 वाजता भेळेची गाडी बंद होऊ दे, मी तुम्हाला सर्व हिशेब सांगतो, रात्री दोननंतर राजाभाऊंनी आपल्या भेळेच्या गाडीवरची उलाढाल अधिकाऱ्यांना समजावून सांगितली आणि या उलाढालीवर कर भरावा लागत असेल तर सगळा कर भरतो, म्हणून तयारी दर्शवली. त्या वेळेपासून आजअखेर ते प्राप्तिकर भरत आहेत.

राजाभाऊंचे 7 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचे चिरंजीव बापू, नातू करण तसेच कुमार आणि सोबत 10 कर्मचारी भेळेची गाडी चालवत आहेत. साधी भेळ, सुकी भेळ, भेवडा, फरसाण भेळ, टी टाईम भेळ अशी व्हरायटी आहे.

VIDEO:

Published On - 5:22 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI