अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, अभिनेत्री मानसी नाईक भावूक

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Aug 10, 2019 | 10:18 PM

जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी या मागणीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. वारंवार मागणी करुनही सरकार आणि प्रशासनाने दाद दिली नाही, म्हणून हा निर्णय घेतल्याचे सय्यद यांनी सांगितले.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, अभिनेत्री मानसी नाईक भावूक

अहमदनगर : जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी या मागणीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. वारंवार मागणी करुनही सरकार आणि प्रशासनाने दाद दिली नाही, म्हणून हा निर्णय घेतल्याचे सय्यद यांनी सांगितले. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दीपाली सय्यद यांच्या उपोषणाला सिनेअभिनेत्री मानसी नाईकनेही पाठिंबा दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी यासाठी मागील मोठ्या काळापासून अभिनेत्री दीपाली सय्यद पाठपुरावा करत आहेत. जुलै 2019 मध्ये त्यांनी सरकारला ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही योजना पूर्ण करण्यासाठी कार्यवाही झाली नाही.

दीपाली सय्यद यांनी क्रांती दिनापासून (9 ऑगस्ट) जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिनेअभिनेत्री मानसी नाईकसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी मानसी नाईक यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनाही सेल्फी व्हिडीओवरुन अप्रत्यक्ष टोला लगावला. ती म्हणाली, “पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्याच्यासाठी हात पसवण्याची वेळ का यावी. पाण्यासाठी हे उपोषण करावं लागत आहे याचं दुःख वाटतं. दीपालीसह अनेक गावकरी देखील उपोषण करत आहे.” यावेळी दीपाली सय्यद यांची अवस्था पाहून मानसी नाईक भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

सय्यद यांनी जोपर्यंत साखळाई योजनेला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत प्राण गेला तरी उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या उपोषणानंतर श्रीगोंदा तालुक्यातील साखळाई पाणी योजनेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. सय्यद यांच्या उपोषणाला मानसी नाईक, सीमा कदम, माधुरी पवार, श्वेता परदेशी, सायली परहाडकर यांनी पाठिंबा दिला आहे.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही ते पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही झाली नाही. श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेतून पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मागील अनेक दिवसांपासून दीपाली सय्यद या योजनेसाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांना लाभधारक गावातूनही मोठा पाठिंबा मिळाला आहे.

साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील 20 वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी या योजनेच्या माध्यमातून फक्त राजकारणच करत आहेत. म्हणूनच तात्काळ या योजनेला मंजूरी न मिळाल्याने आपण हे आमरण उपोषण करत असल्याची भूमिका सय्यद यांनी मांडली.

संबंधित बातम्या:

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा आमरण उपोषणाचा इशारा, साखळाई पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता

सुजय विखेंना ‘या’ अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI