Asha Bhosle Birthday Special | ‘चिरतरुण’ आशा भोसले यांच्याविषयी 20 रंजक गोष्टी

आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा जवळपास 20 भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

Asha Bhosle Birthday Special | 'चिरतरुण' आशा भोसले यांच्याविषयी 20 रंजक गोष्टी

मुंबई : ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए’ हे आशाताईंच्या आवाजातील गाणं ऐकताना काळीज चिरत जातं, तर ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ ऐकताना गलबलून येतं! ‘पिया तू अब तो आजा..’ किंवा ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ मधली ‘नजाकत’ वेगळी आणि ‘मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ मधली ‘सादगी’ वेगळी. ‘मुझे रंग दे..’ ऐकताना पाय आपोआप ठेका धरतात, तर ‘रंगिला रे…’ ऐकताना आपण डान्स फ्लोअरवरच असतो. याच आशाताईंनी ‘मागे उभा मंगेश म्हटलं आहे’ आणि याच आशा भोसलेंनी ‘चुरा लिया है तुमने जो दिल को…’ म्हटलं आहे. गळा तोच, आवाजही तोच मात्र गाण्यातील वैविध्य अफाट. (Melody Queen Asha Bhosle 87th Birthday)

‘मेलडी क्वीन’ आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या भगिनी. आशा भोसले यांनी वयाची 87 वर्ष पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या थोरल्या भगिनी मीना खडीकर यांचाही आजच (8 सप्टेंबर) 89 वा वाढदिवस. आशा भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील 20 ठळक गोष्टींवर एक नजर

आशा भोसले यांच्याविषयी 20 रंजक गोष्टी

1) घरात नाट्य आणि संगीताचं वातावरण असल्यामुळे आशा भोसले यांना बालपणापासूनच गाण्याची आवड होती. 1943 मध्ये त्यांची गायन कारकीर्द सुरु झाली. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडपटांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी ‘सावन आया’ गाण्यासाठी आशा भोसले यांना सर्वप्रथम संधी दिली.

2) आशा भोसलेंच्या करिअरला सुरुवात झाली, तेव्हा गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यासारख्या दिग्गज गायिका चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशाताईंच्या वाट्याला येत असत. विशेषतः खलनायिका, आयटम साँग्ज किंवा सहअभिनेत्रींवर चित्रित झालेल्या गाण्यांना आशा भोसले यांचा आवाज होता.

3) आशा भोसले यांनी सुरुवातीला ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ या गाण्यासाठी इन्कार दिला होता. पाश्चिमात्य धाटणीचं गाणं त्यांना आव्हानात्मक वाटत होतं.

4) आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा जवळपास 20 भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. एक हजारपेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. भजन असो वा गझल, लोकगीत असो किंवा लावणी, कव्वाली, युगुलगीत, उडत्या चालीची गाणी, पाश्चिमात्य पद्धतीची अशी वेगवेगळ्या धाटणीची गाणी त्यांच्या गळ्याला शोभतात.

5) आशा भोसले यांना सुरुवातीला पॉप सिंगर किंवा कॅबरे सिंगर अशी बिरुद देण्यात आली, मात्र ‘उमराव जान’मध्ये ‘इन आंखो की मस्ती’, ‘दिल चीज क्या है’ अशी गाणी गाऊन त्यांनी आपण गझल गायकीही ताकदीने पेलू शकत असल्याचं दाखवून दिलं

6) ओपी नय्यर, खय्याम, एसडी बर्मन, आरडी बर्मन, इलियाराजा, शंकर जयकिशन, ए आर रहमान अशा असंख्य संगीतकारांसोबत आशा भोसले यांची जोडी जमली.

7) आशा भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. नव्या गायकांना संधी मिळावी यासाठी 1979 मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी यापुढे पार्श्वगायनाच्या पुरस्कारासाठी आपला विचार करु नये, अशी विनंती केली. आशा भोसले यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.

8) ‘उमराव जान’ चित्रपटातील ‘दिल चीज क्या है’ (1981) आणि ‘इजाजत’ चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ या रसिकप्रिय गाण्यांसाठी आशा भोसले यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

9) ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आशा भोसले यांच्या नावे सर्वाधिक गाणी गायल्याची नोंद आहे. आशा भोसले यांनी आपण 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायल्याचं 14 वर्षांपूर्वी सांगितलं होतं.

10) भारत सरकाराने आशा भोसले यांचा दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे. (Melody Queen Asha Bhosle 87th Birthday)

11) आशा भोसले यांनी अभिनयातही आपली झलक दाखवली आहे. 2013 मध्ये प्रदर्शित ‘माई’ चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता.

12) आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. गणपतराव हे लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी होते. त्यामुळे लता मंगेशकरांसह संपूर्ण कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. विरोध पत्करुन आशा भोसलेंनी लग्न केलं, त्यामुळे बहिणींच्या नात्यात कटुता आली.

13) गणपतराव आणि आशाताई यांना तीन मुलं झाली. सर्वात मोठे पुत्र हेमंत पायलट होते. त्यानंतर त्यांनी संगीतकार म्हणून काही चित्रपट केले. कन्या वर्षा वृत्तपत्रांसाठी लेखन करत होत्या. तर सर्वात लहान चिरंजीव आनंद यांनी बिझनेस आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. वर्षा यांनी वयाच्या 56 व्या वर्षी 2012 मध्ये आत्महत्या केली होती. तर हेमंत यांचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं.

14) अकरा वर्षांच्या संसारानंतर 1960 मध्ये दोघं विभक्त झाले. गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर आशा भोसले यांनी संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन उर्फ पंचमदा यांच्यासोबत 1980 मध्ये लग्न केलं. आर डी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. तर आरडी यांचंही हे दुसरं लग्न होतं. 1994 मध्ये पंचमदा यांचं निधन झालं.

15) आशा भोसले यांना पाककलेचीही विशेष आवड आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे नेहमीच चिकन-मटण आणि बिर्याणी करुन आणण्याची मागणी करतात. आपण गायिका म्हणून यशस्वी झालो नसतो, तर शेफ झालो असतो, असं त्या सांगतात.

16) आशा भोसले यांना मिमिक्रीचीही आवड आहे. लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजाची त्या हुबेहुब नक्कल करतात.

17) दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाची रेस्टॉरंट्स आहेत. इथे पारंपरिक उत्तर आणि पश्चिम भारतीय जेवण मिळतं. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीनमध्येही त्यांची रेस्टॉरंट्स आहेत.

18) ब्रिटनच्या अल्टरनेटिक रॉक बॅण्डने ‘ब्रिमफुल ऑफ आशा’ 1997 मध्ये रिलीज केलं होतं. आशा भोसलेंना डेडिकेट केलेलं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झालं होतं.

19) महाराष्ट्र सरकारच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना 1999 मध्ये गौरवण्यात आलं होतं. तर इंडो-पाक असोसिएशनच्या ‘नाइटिंगल ऑफ एशिया’ पुरस्काराने त्यांना 1987 मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं.

20) 1997 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासह ‘लिगसी’ अल्बमसाठी ‘ग्रॅमी’ पुरस्काराचं नामांकन मिळालेल्या आशा भोसले या पहिल्या भारतीय ठरल्या होत्या.

(Melody Queen Asha Bhosle 87th Birthday)

Published On - 8:00 am, Tue, 8 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI