प्रियांका गांधींवर अश्लिल टीप्पणी, ‘मोदी भक्ताला’ बिहारमध्ये बेड्या

प्रियांका गांधींवर अश्लिल टीप्पणी, 'मोदी भक्ताला' बिहारमध्ये बेड्या

पाटणा: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या फोटोशी छेडछाड करुन, सोशल मीडियावर अश्लिल टिप्पणी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बिहार पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीला अटक करुन त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. योगी सूरजनाथ असं या आरोपीचं नाव आहे. योगी सूरजनाथ हा सोशल मीडियावर स्वत:ला नरेंद्र मोदींचा भक्त संबोधतो.

योगी सूरजनाथ हा बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील बिनोदपूर परिसरातील रहिवासी आहे. तो ट्विटरवरील ‘मिशन भाजप 2019’ चा उत्साही फॉलोअर आहे. मात्र या व्यक्तीशी आपला काहीही संबंध नाही, असं भाजप जिल्हा प्रमुख मनोज राय यांनी सांगितलं.

दरम्यान, योगी सूरजनाथने 30 जानेवारीला केलेल्या ट्विटबाबत तक्रार मिळाली होती, असं पोलिसांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते शाहीन सैय्यदने याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सूरजनाथला कटिहारमधून शोधून काढलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, त्याला कोर्टात हजर केलं असता, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

नुकतंच प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियांका यानिमित्ताने पहिल्यांदाच सक्रीय राजकारणात दिसणार आहेत. मात्र विरोधकांनी त्यांच्यावर टीका करताना, पातळी सोडल्याचं दिसून येतंय.

Published On - 1:06 pm, Tue, 5 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI