विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाला भावाने संपवलं

विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाला भावाने संपवल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात घडला. गुंडाची हत्या केल्यानंतर भावाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

  • Updated On - 4:52 pm, Sat, 16 January 21 Edited By: Team Veegam
विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाला भावाने संपवलं

नागपूर : विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाला भावाने संपवल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात घडला. गुंडाची हत्या केल्यानंतर भावाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले (Brother Murder Guns). नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरातील गुरु घासीदास गुरुद्वाराच्या परिसरात ही घटना घडली. नेहमी पूजेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात शुक्रवारी रात्री नागपूरच्या गुन्हेगारीचा काळा चेहरा समोर आणणारा दुर्दैवी प्रसंग घडला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे (Brother Murder Guns)..

नागपूरच्या कळमना परिसरातील मिनिमाता नगर परिसरात गुरु घासीदास गुरुद्वारा परिसर नेहमी धार्मिक कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. या परिसरात शुक्रवारी रात्री अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. विवाहित बहिणीची वारंवार छेड काढणाऱ्या गुंडाची 19 वर्षीय भावाने हत्या केली. या गुंडाला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तो बहिणीला त्रास देत असल्याने या भावाने हे टोकाचं पाऊल उचललं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन चौरासिया नावाचा गुंड मिनिमाता नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेला त्रास द्यायचा. वारंवार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, जबरदस्ती घरात यायचा, अश्लील बोलून शरीर सुखाची मागणी करायचा. इतकंच नाही, तर कोणाला काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही रोशन ने विवाहितेला दिली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने विवाहितेने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र, शुक्रवारी रात्री रोशन थेट विवाहितेच्या घरात शिरला, तिचा पदर घेचून तिची छेडखानी केली. तेव्हा घाबरलेल्या विवाहितेने लहान भावाला हाक मारली. बहिणीची हाक ऐकताच भाऊ राजा भारती आला. आपल्या बहिणीची रोशन छेड काढत असल्याचं पाहून राजा संतापला. राजा आणि रोशनमध्ये वाद झाला.

या वादानंतरही रोशन परिसरातच घुटमळत राहिला. काही वेळाने पुन्हा त्यांच्यात वाद झाला. मात्र, यावेळी रोशनने राजावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हाणामारीदरम्यान राजाने रोशनच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि त्याच चाकूने भोकसून त्याची हत्या केली. बहिणीच्या अब्रूसाठी आपल्या हातून खून झाल्याचं राजाला समजताच त्याने थेट कळमना पोलीस ठाणे गाठले. तिथे त्याने हत्येची कबुली देत आत्मसमर्पण केलं.