नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? किती लोकांच्या तोंडी राहुल गांधींचं नाव? वाचा ताज्या Survey चे 10 महत्त्वाचे मुद्दे!

नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? किती लोकांच्या तोंडी राहुल गांधींचं नाव? वाचा ताज्या Survey चे 10 महत्त्वाचे मुद्दे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी

पंतप्रधान मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असे किती लोक मानतात? किती लोक राहुल गांधींचं नाव घेतात? आजच लोकसभा निवडणुकीत एनडीएला किती मतं मिळतील? अशा दहा प्रश्नांची अत्यंत उत्कंठावर्धक उत्तरे वाचायलाच हवीत

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 21, 2022 | 11:46 AM

 दिल्ली: महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाल्यानंतर विधानसभेचे चित्र काय असेल याचे आडाखे बांधले जात आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सध्या कोणते वारे वाहतायत, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. देशात आजच लोकसभा निवडणूक झाल्या तर कोणता पक्ष सरकार स्थापन करेल, भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय कोणता आहे, आदी प्रश्नांची उत्तरे नुकतीच एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्यात आली. भारताच्या जनतेनं अत्यंत महत्त्वाचा कौल या सर्वेक्षणातून दिला आहे. India Today MOTN Survay ने नुकतेच हे सर्वेक्षण केले असून त्यात पुढील दहा निष्कर्ष महत्त्वाचे ठरले आहेत.

1- नरेंद्र मोदी सरकारवर किती लोक समाधानी आहेत?

सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवलेल्यांपैकी 59 टक्के लोकांनी सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. तर 26 टक्के लोक असमाधानी असल्याचे सांगतात. या सर्व्हेनुसार, 63 टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगले काम केलंय, असे मान्य करतात. तर 15 टक्के लोक म्हणतात मोदींनी सुमार कामगिरी केली आहे. तर 21 टक्के लोकांना अत्यंत वाईट कामगिरी वाटतेय.

2- देशाचे पुढचे पंतप्रधान कोण?

या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 52.5 टक्के लोकांनी या प्रश्नावर नरेंद्र मोदी हेच उत्तर दिले आहे. तर 6.8 टक्के लोकांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी हे पुढील पंतप्रधान असतील, असे उत्तर दिलंय. तर 5.7 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ, 3.5 टक्केंनी अमित शहा आणि 3.3 टक्के लोकांनी प्रियंका गांधी यांचे नाव घेतले.

3- निवडणूक होणाऱ्या राज्यांत मोदी किती लोकप्रिय?

या प्रश्नाचे उत्तर देताना लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशात जास्त लोकप्रिय असल्याचे सांगितले आहे. 75 टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर समाधानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मणिपूर आहे. तेथील 73 टक्के लोक मोदींवर खुश आहेत. गोव्यातील 67 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. तर उत्तराखंडमधील 59 टक्के लोकांनी मोदींना चांगलं म्हटलं. पंजाबमध्ये मोदींना सर्वात कमी रेटिंग मिळालंय. तेथील 37 टक्के लोकांनीच त्यांच्या कामावर खुश असल्याचं म्हटलंय.

4- राम मंदिरचं यश देशासाठी किती मोठं?

अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणे हे मोदींचे सर्वात महत्त्वाचे काम नाही, असे लोकांनी म्हटले आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी 15.7 टक्के लोकांनीच राम मंदिर हे खूप मोठे कार्य असल्याचे म्हटले आहे. तर फक्त 12 टक्के लोकांनी काश्मीरमधून 370 कलम हटवण्याला सर्वात मोठे यश म्हटले आहे.

5- मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश कोणते?

सर्व्हेनुसार, मोदी सरकार तीन महत्त्वाच्या गोष्टीत अपयशी असल्याचे समोर आले आहे. यात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आंदोलन या तीन गोष्टींचा समावेश आहे. 25 टक्के लोकांनी महागाई हे सर्वात मोठे अपयश मानले आहे. तर 14 टक्के लोकांनी बेरोजगारी आणि 10 टक्के लोकांनी शेतकरी आंदोलनाला सर्वात मोठे अपयश मानले आहे.

6- सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?

देशात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षणातून समोर आलंय. ओडिशातील 71 टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्यांच्या कामावर 69.9 टक्के लोक समाधानी आहेत. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यावर 67.5 टक्के लोक समाधानी आहेत.

7- भाजपचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?

भाजपच्या देशातील एकूण मुख्यमंत्र्यांपैकी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनाच फक्त 50 टक्क्यांपेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे. सर्व्हेनुसार, त्यांच्यावर 56.6 टक्के लोक समाधानी आहेत. गुजरात, उत्तराखंड, युपी आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे रेटिंगही 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे रेटिंग सर्वात कमी असून ते 27.2% एवढे आहे.

8- मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा फायदा कुणाला?

बहुतांश लोकांच्या मते, मोदी सरकराच्या आर्थिक धोरणांचा सर्वाधिक फायदा उद्योगजगातील घराण्यांना झाला आहे. सर्व्हेनुसार, 47.7 टक्के लोकांच्या मते, एनडीए सरकारच्या आर्थिक धोरणांचा फायदा उद्योगातील घराण्यांना झाला आहे. तर 7.6% लोकांच्या मते लहान व्यावसायिकांनाही याचा फायदा झाला.

9- भाजपात मोदींना पर्याय कोण?

भाजपात नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा सर्वात लोकप्रिय आहेत, असे सर्व्हेतून दिसून आले. त्यांच्या बाजूने 24 टक्के लोकांनी मते दिली. तर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही 23% लोकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा, असा पर्याय दिला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 11% लोकांनी मोदींना पर्याय मानलं आहे.

10- आज लोकसभा निवडणूक झाली, तर NDA ला किती जागा?

आजच लोकसभा निवडणूक झाली तर NDA ला 296 जागा मिळतील. तर युपीएच्या खात्यात 126 जागा येतील. इतर पक्षांना 120 जागा मिळतील, असा अंदाज लोकांनी वर्तवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 67 जागा एनडीएला, सपाला 10 आणि बसपाला 2 तर काँग्रेसला एक जागा मिळेल, असा अंदाज सर्व्हेच्या माध्यमातून देशातील जनतेने व्यक्त केला आहे.

इतर बातम्या

Kisan Rail : शेतकऱ्यांना हवा ‘किसान रेल’चा आधार, उत्पादन वाढले शेतीमाल वाहतूकीसाठी साकडे

अल्पशिक्षित चपराशी तरुण ते इंग्रजी वृत्तपत्रातील उपसंपादक… नंतर संपादक; दिनकर रायकर यांचा रंजक प्रवास


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें