अल्पशिक्षित चपराशी तरुण ते इंग्रजी वृत्तपत्रातील उपसंपादक… नंतर संपादक; दिनकर रायकर यांचा रंजक प्रवास

अल्पशिक्षित चपराशी तरुण ते इंग्रजी वृत्तपत्रातील उपसंपादक... नंतर संपादक; दिनकर रायकर यांचा रंजक प्रवास
Dinkar Raikar

ज्येष्ठ साक्षेपी संपादक दिनकर रायकर आज पहाटे 3 वाजता निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 21, 2022 | 11:46 AM

मुंबई: ज्येष्ठ साक्षेपी संपादक दिनकर रायकर आज पहाटे 3 वाजता निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळ ते पत्रकारितेत सक्रिय होते. अल्पशिक्षित चपराशी तरुण ते इंग्रजी वृत्तपत्रातील उपसंपादक आणि नंतर दैनिक लोकमतचे समूह संपादक असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास रंजक राहिला आहे. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दिनकर रायकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना डेंग्यू आणि कोरोनाची लागण झाली होती. डेंग्यूतून ते बरेही झाले होते. मात्र यकृतात संसर्ग झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची गुरुवारी रात्री कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांची चाचणी निगेटिव्हही आली होती. मात्र, शरीर उपचारांना साथ देत नव्हते. आज पहाटे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूर ते मुंबई

रायकर यांचा पत्रकारितेतील प्रवास रंजकच नाही तर थक्क करणारा आहे. अल्पशिक्षित असलेल्या रायकर यांनी नागपुरातील एका इंग्रजी दैनिकात चपराशी म्हणून नोकरी स्वीकारली होती. तिथल्या टेलिप्रिंटरच्या तारा फाडून संपादकांकडे देण्याचं काम त्यांच्याकडे होतं. तिथून ते मुंबईत आले. इंडिय एक्सप्रेसमध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. मुंबईत घर नसल्याने इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयातच त्यांनी बिऱ्हाड टाकलं. टीपी ऑपरेटर, रिपोर्टर ते डेप्युटी एडिटर पर्यंत त्यांन मजल मारली. त्यानंतर लोकसत्तातून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमतच्या समूह संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

अचाट उत्साह आणि अफाट लोकसंग्रह

ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून रायकर यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळी दिला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘लोकसत्ता’मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दुसरी इनिंग सुरू केली ती ‘लोकमत’मध्ये. आणि, तीच एवढी प्रदीर्घ होती की लोकांचे पहिले डावही एवढे निर्धोक पार पडत नाहीत. ‘एज इज ओन्ली नंबर’ या वाक्याचा पुरावा म्हणजे दिनकर रायकर. सत्तरीतही ते ज्या उत्साहाने, मजेने आणि तडफेने कामे हातावेगळी करत आणि छान हसत सगळ्यांशी संवाद साधत; कोपरखळ्या मारत, ती अक्षरशः किमया होती. विधिमंडळातले असंख्य किस्से त्यांच्याकडे होते. तरूण पोरा-पोरींनाही मित्र करण्याची जिंदादिली त्यांच्यामध्ये होती. त्यांचा अचाट उत्साह आणि अफाट लोकसंग्रह याविषयीच्या खूप आठवणी सांगता येतील, असं आवटे म्हणतात.

टेलिप्रिंटरच्या तारा फाडता फाडता, इंग्रजी रिपोर्टर

कोल्हापुरातला अल्पशिक्षित पोर नागपुरातल्या एका इंग्रजी दैनिकात चपराशी म्हणून कामाला लागतो. तिथल्या टेलिप्रिंटरच्या तारा फाडता फाडता, इंग्रजी रिपोर्टर होतो. पुढे मुंबईत येत इंडियन एक्स्प्रेस समूहात ‘डेप्युटी एडिटर’ या पदापर्यंत पोहोचतो… हा सगळा प्रवास रंजक आहे. एकविसावे शतक माध्यमांचे आणि माध्यम तरूणाईचे, असे म्हटले जात असताना, एकविसाव्या शतकात साठी उलटलेले रायकर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या माध्यमसमूहाचे नेतृत्व करतात आणि त्याला नवा चेहरा देतात, हे तसे स्तिमित करून टाकणारेच, असं आवटे यांनी म्हटलं आहे.

मूल्यांचे जतन करणारा संपादक गमावला: मुख्यमंत्री

पत्रकारितेच्या क्षेत्रात मूल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही  मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला: अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रायकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

चालता बोलता इतिहास: भुजबळ

सतत पन्नास वर्षाहून अधिक काळ समर्पित भावनेने पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील पितामह व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशी शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेत मी नगरसेवक म्हणून निवडणून आलो होतो तेंव्हा पासून दिनकर रायकर आणि माझा स्नेह होता. त्यांचा जनसंपर्क हा अतिशय दांडगा होता. सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेत काम करणारे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून दिनकर रायकर यांची ओळख होती. टीपी ऑपरेटर, रिपोर्टर, संपादक आणि लोकमत समूहाचे समूह संपादक पदापर्यंतचा त्यांचा पत्रकारितेतील यशस्वी प्रवास थक्क करणारा होता. अत्यंत दांडगा जनसंपर्क असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील राजकीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास होता. गेल्या ५० वर्षातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा ते चालता बोलता इतिहास होते, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीची सर्वात मोठी भूमिका

gehraiyaan movie : दीपिका पादुकोणचा ‘तो’ बोल्ड अंदाज पती रणवीर सिंगलाही आवडला, ‘गेहराईयाँ’चा ट्रेलर पाहून म्हणाला…

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : नागपूर : गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें