नक्षलवाद्यांकडून गडचिरोली बंदची हाक,  लोकांमध्ये दहशतीचे वातावरण

नक्षलवाद्यांकडून गडचिरोली बंदची हाक,  लोकांमध्ये दहशतीचे वातावरण

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांनी हैदोस घातला आहे. आज (19 मे) नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बंद पुकारला आहे. रस्त्यावरील झाडे तोडून गडचिरोलीतील एटापल्ली-आलापल्ली मार्ग नक्षलवाद्यांकडून बंद पाडण्यात आला आहे. जांभुळखेडा, दादापूर, रामगड ,कुरुंडी, चिखली या भागात नक्षलवाद्यांकडून बंद पुकारण्यात आला आहे.

गडचिरोलीत 27 एप्रिलला चकमक झाली होती. यात  रामको आणि शिल्पा या दोन महिला माओवादी ठार झाल्या होत्या. त्यांच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बंद घोषित केला आहे. या बंदमुळे दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील बससेवेसह इतर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

तसेच नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील एटापल्ली-आलापल्ली मार्गवर झाडे तोडून मार्ग बंद केला आहे. छत्तीसगड कांकेरहून एटापल्ली मार्गही बंद करण्यात आला आहे.

त्याशिवाय गुरुपल्लीजवळ वनविभागाची लाखो रुपयांची लाकडेही नक्षलवाद्यांनी जाळली आहेत. या पार्श्वभूमीवर काही वाहनांचीही जाळपोळ नक्षलवाद्यांकडून करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी पत्रकं, फलक लावून लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. पोलिसांनी अलर्ट जारी केला असून नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान गडचिरोलीतील दादापूर रामगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. दादापूरपासून 7 किमी अंतरावर असलेल्या एका लाकडाच्या डेपोलाही आग लावली. त्याशिवाय नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत ठिकठिकाणी लाल रंगाचे बॅनरही लावले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI