आधी जिम-थिएटर, आता ‘या’ व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात

रेस्टॉरंट व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, सोशल डिस्टन्सिंगचे आवश्यक दिशानिर्देश जारी करत ती सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली

आधी जिम-थिएटर, आता 'या' व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात

मुंबई : रेस्टॉरंटस व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन मागणी केली आहे. याआधी जिम आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरु करण्याबाबतही सुळे यांनी पाठपुरावा केला होता. (NCP MP Supriya Sule asks CM Uddhav Thackeray to consider opening Restaurants)

“कोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली, तरी ती या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

“रेस्टॉरंट व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा” अशी विनंती सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करुन केली आहे. ‘महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब’चे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेले पत्रही त्यांनी सोबत जोडले आहे.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकपडदा थिएटर्स बंद आहेत. यामुळे राज्यातील एकपडदा थिएटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी गेल्या आठवड्यात केले होते.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने ती पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे” असंही सुप्रिया सुळे यापूर्वी ट्विटरवर म्हणाल्या होत्या. (NCP MP Supriya Sule asks CM Uddhav Thackeray to consider opening Restaurants)

‘अनलॉक-4’ मध्ये राज्यात काय सुरु-काय बंद?

  • कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
  • हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार, रेस्टॉरंटना परवानगी नाही
  • शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
  • चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
  • मंदिरं आणि जिम उघडण्याबद्दल अद्याप घोषणा नाही
  • मेट्रो 30 सप्टेंबरपर्यंत धावणार नाही
  • खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा
  • आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द

संबंधित बातम्या :

सिंगल स्क्रीन थिएटर चालक आर्थिक अडचणीत, मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, सुप्रिया सुळेंचे ट्वीट

जिम सुरु करा, राज ठाकरे-फडणवीसांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांची मागणी

(NCP MP Supriya Sule asks CM Uddhav Thackeray to consider opening Restaurants)

Published On - 8:22 am, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI