पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमा आणि भारतीय जाहिरातींवर बंदी

पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमा आणि भारतीय जाहिरातींवर बंदी

इस्लामाबाद : माणूस रागाच्या भरात काहीही करुन बसतो, पण त्याचा तोटा कुणाला होतो याचं भान रागात राहत नाही. तसंच काहीसं पाकिस्तानच्या बाबतीत झालंय. कारण, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय सिनेमे आणि भारतीय जाहिरातींवर बंदी घातली आहे. पण याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. भारतीय सिनेमा दाखवल्यामुळे पाकिस्तानला कोट्यवधींचा महसूल मिळत होता, तर जाहिरातींमुळे तेथील वाहिन्यांना पैसे मिळत होते. आता पाकिस्तानच्या या निर्णयावर त्यांची जनता किती समाधानी आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर आपल्याच सीमेत येऊन आपल्यावरच हल्ला केल्याने पाकिस्तान चिडलाय. त्यामुळे पाकिस्तानने भारतीय सिनेमांवर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी याबाबत माहिती दिली. शिवाय भारतात निर्मित झालेल्या जाहिरातींवरही बंदी घालण्यात यावी, अशा सूचना पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलॅटरी अथॉरिटीला (पीईएमआरए) देण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले.

खरं तर पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारताला काहीही फटका बसणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापार अत्यंत कमी आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने तिथे विकण्याचा फार तोटा भारताला नाही. म्हणूनच जाहिरातींवर बंदी घातली तरी भारतीय उत्पादनांना आणि भारतीय जाहिरात व्यवसायाला तोटा होणार नाही असा अंदाज लावला जातोय.

दुसरं म्हणजे पाकिस्तानने भारतीय सिनेमांवर बंदी घालण्यची ही पहिलीच वेळ नाही. अनेक भारतीय सिनेमांमुळे पाकिस्तानच्या भावना दुखावतात आणि ते या भारतीय सिनेमाचं प्रदर्शन होऊ देत नाहीत. यामध्ये पाकिस्तानमधील ज्या प्रेक्षकांना भारतीय सिनेमा आवडतो, त्यांचीच नाराजी पाक सरकारला ओढवून घ्यावी लागते. यावेळीही पाकिस्तान सरकारने तेच काम केलंय.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकचा एमएफएन दर्जा रद्द

पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजेच एमएफएन दर्जा काढून घेतला. शिवाय पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के इम्पोर्ट ड्युटी वाढवली. त्यामुळे पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलंय. शिवाय भारताकडून जाणाऱ्या वस्तूही बंद झाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये टोमॅटो, आद्रक यांचे दर गगनाला भिडले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI