खटला कुठेही चालू द्या, पाकिस्तानला कुलभूषण यांना न्याय द्यावाच लागेल : हरिश साळवे

पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. भारतासाठी हा सर्वात मोठा खटला लढवण्याची जबाबदारी दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे होती. हा आपला मोठा विजय असल्याचं सांगत हरिश साळवे यांनी आयसीजेच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि पाकिस्तानकडून निष्पक्ष पद्धतीने न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

खटला कुठेही चालू द्या, पाकिस्तानला कुलभूषण यांना न्याय द्यावाच लागेल : हरिश साळवे

हेग, नेदरलँड : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. भारतासाठी हा सर्वात मोठा खटला लढवण्याची जबाबदारी दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे होती. हा आपला मोठा विजय असल्याचं सांगत हरिश साळवे यांनी आयसीजेच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि पाकिस्तानकडून निष्पक्ष पद्धतीने न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

“… तर पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात जाऊ”

आयसीजेच्या निर्णयानंतर लंडनमध्ये भारतीय दुतावासात हरिश साळवे यांनी माध्यमांना संबोधित केलं. कुलभूषण जाधव यांना आता निष्पक्ष पद्धतीने न्याय दिला जाईल ही अपेक्षा व्यक्त करण्याची सध्या वेळ आहे. जर पाकिस्तानने न्याय दिला नाही तर आपण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्यासाठी मोकळे आहोत, असं हरिश साळवे म्हणाले.

“खटला कुठेही चालवा, न्याय द्यावा लागणार”

पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती देत नव्याने खटला सुरु करण्याचे आदेश आयसीजेने दिले. पण पुन्हा मिलिट्री कोर्टातच खटला सुरु केला जाणार का, याबाबतही शंका आहे. पण यावरही हरिश साळवे यांनी उत्तर दिलं. पाकिस्तानने मिलिट्री कोर्टात खटला सुरु केला तरीही त्यांना निष्पक्ष न्याय द्यावा लागेल. जर मिलिट्री कोर्टाचे नियम त्याच्या आड येत असतील तर त्यात बदल करावे लागतील. हे सर्व करण्यास पाकिस्तान बांधिल आहे, असं हरिश साळवे म्हणाले.

कौन्सिलर एक्सेसचा फायदा काय?

भारताला कौन्सिलर एक्सेस भेटल्याबद्दल हरिश साळवे यांनी समाधान व्यक्त केलं. यामुळे होणारा फायदाही त्यांनी सांगितला. कौन्सिलर एक्सिस म्हणजेच वकिलातीमुळे आपल्याला कुलभूषण जाधव यांच्याशी संवाद साधता येईल, चांगला वकील देता येईल आणि त्यांचे कुटुंबीयही भेटू शकतात. यामुळे कुलभूषण यांच्या अधिकारांचं रक्षण होईल, ज्यामुळे निष्पक्ष पद्धतीने न्यायाची अपेक्षा करता येईल. न्याय न मिळाल्यास आपण पुन्हा आयसीजेमध्ये जाऊ, असं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानने वापरलेल्या भाषेवर नाराजी

दरम्यान, आयसीजेमध्ये युक्तीवाद सुरु असताना पाकिस्तानच्या वकिलांकडून वापरण्यात आलेल्या शब्दांबद्दलही हरिश साळवे यांनी नाराजी व्यक्त केली. पण मी कधीही पाकिस्तानसाठी अपशब्द वापरले नाही आणि ती भारतीय संस्कृतीही नाही, असं ते म्हणाले. भारताच्या वर्तवणुकीबद्दल पाकिस्तानच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता.

पाकिस्तानमध्ये खटला कोण लढणार?

पाकिस्तानमध्ये खटला सुरु झाला तरी तो लढणार कोण, असाही प्रश्न उपस्थित होतो. यावर हरिश साळवे यांनी उत्तर दिलं. भारतीय वकील म्हणून मला तिथे जाऊन लढण्याचा अधिकार आहे असं वाटत नाही. पण निश्चितच पाकिस्तानमध्येही चांगले वकील आहेत, जे खटला लढू शकतात, असंही हरिश साळवेंनी सांगितलं.

पाकिस्तानवर निर्णय बांधिल आहे का?

आयसीजेने दिलेला निर्णय पाकिस्तानवर बांधिल आहे का, असा प्रश्नही हरिश साळवे यांना विचारण्यात आला. यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. ‘भारताच्या सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एखादा आदेश दिला आणि तो मान्य करण्यास सरकारने नकार दिला तर कोर्ट काय करु शकतं?’, असं उदाहरण त्यांनी दिलं. कोर्टाचं मत हे नेहमी जनतेचं मत असतं. पण पाकिस्तानला हा निर्णय मान्य करावा लागेल आणि तो मान्य न केल्यास आपल्याकडे इतरही पर्याय आहेत. त्यांच्यावर संयुक्त राष्ट्राकडून विविध सँक्शन्स घातले जाऊ शकतात. पण पाकिस्तान त्या मार्गाने जाणार नाही, असं वाटतं. कुलभूषण यांना योग्य न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

देशातले सर्वात महागडे वकील हरिश साळवे कोण आहेत?

कुलभूषण जाधव प्रकरण : हरिश साळवेंनी त्यांचं काम केलं, आता मोदींचं काम सुरु

मोदी है तो मुमकीन है! सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI