IND vs AUS : 23 वर्षीय ऋषभ पंतने इतिहास रचला, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सध्या सुरु आहे. या सामन्यातील पाचव्या दिवसावर ऋषभ पंतने वर्चस्व गाजवलं.

IND vs AUS : 23 वर्षीय ऋषभ पंतने इतिहास रचला, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर
अक्षय चोरगे

|

Jan 11, 2021 | 11:30 AM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सध्या सुरु आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसावर ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवलं होतं. काल (रविवारी) टीम इंडियाने चौथ्या दिवसअखेर 2 विकेट गमावून 98 धावा केल्या होत्या. तेव्हा चेतेश्वर पुजारा 9 तर अजिंक्य रहाणे 4 धावांवर नाबाद होते. परंतु आज भारताची सुरुवात खूप वाईट झाली. सकाळी सुरुवातीलाच रहाणे (4) बाद झाला. त्यामुळे भारतीय संघ बॅकफुटवर गेला होता. परंतु विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंतने आज वनडे मॅचच्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत 118 चेंडूत 97 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले तर पुजाराने 205 चेंडूत 12 चौकारांच्या सहाय्याने 77 धावा जमवल्या. (Ind vs Aus Rishabh Pant classic form continues in Australia)

सिडनी टेस्टमध्ये 97 धावांची खेळी करणारा ऋषभ पंत ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 50 पेक्षा अधिक धावा फटकावणारा सर्वात तरुण विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. पंतचं वय 23 वर्ष 95 दिवस इतकं आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन विकेटकीपर इयान हीली याच्या नावावर होता. त्याने 24 वर्ष 216 दिवस इतकं वय असताना असा विक्रम केला होता.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या कोपराला दुखापत झाली होती. आज तो फलंदाजी करणार की नाही, असा सवाल उपस्थित झाला होता. तरीदेखील पंत आज मैदानात उतरला आणि त्याने सर्व ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पंतचं शतक तीन धावांनी हुकलं त्यामुळे सर्व भारतीय नाराज असले तरी त्याआधीच त्याने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे. तसेच त्याने अजून एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या देशात सहा कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या सहा सामन्यांमध्ये त्याने 10 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. या 10 डावांमध्ये प्रत्येक वेळी त्याने 25 पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात पंतने 25 धावा केल्या होत्या. 25 ही पंतची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. तर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने 159 धावांची नाबाद खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा सातत्यपूर्ण कामगिरी याआधी कोणत्याही फलंदाजाला करता आलेली नाही.

दुखापतीनंतरही पंतचा संघर्ष

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंतला दुखापत झाली होती. कोपरावर चेंडू लागल्याने तो चौथ्या दिवशी विकेटकीपिंगसाठी मैदानात आला नव्हता. आजही तो खेळेल की नाही, यावर शंका होती. अशा परिस्थितीत पंत मैदानात उतरला. पंतचं आज प्रमोशन करण्यात आलं. नेहमी सहाव्या नंबरवर खेळणारा पंत पाचव्या नंबरवर खेळण्यास आला. मैदानात उतरल्यापासून त्याने आक्रमक फटके खेळण्यास सुरुवात केली आहे. कोपराला झालेल्या दुखापतीने तो अनेकदा विव्हळताना दिसला तरीदेखील त्याची फटकेबाजी सुरु आहे. पंत-पुजारामधील या भागिदारीने भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या आहेत.

भारताची चांगली सुरुवात

दरम्यान, रविवारी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात झाली होती. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात दिली. या दोघांनी 71 धावांची भागीदारी केली. शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. गिल 31 धावांवर बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहितने पुजारासह स्कोअरबोर्ड हलता ठेवला. यादरम्यान रोहितने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकानंतर रोहित आऊट झाला. रोहितने 98 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्ससह 52 धावांची खेळी केली. रोहितनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. या दोघांनी दिवसखेर सावध खेळी केली. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 98 धावा केल्या होत्या. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 309 धावांची आवश्यकता आहे. भारताने आतापर्यंत 206 धावा केल्याने विजयासाठी संघाला 201 धावांची आवश्यकता आहे.

ऑस्ट्रेलियाचा डाव 312 धावांवर घोषित

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डाव 312-6 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताला विजयासाठी 407 धावांचे आव्हान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने 81 धावा केल्या. तसेच मार्नस लाबुशेनने 73 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा

प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

“माझ्यावरही वर्णभेदी टीका करण्यात आली होती”, अश्विनचा धक्कादायक खुलासा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें