सुट्टीवर आलेल्या सैनिकाची दहशत, भर यात्रेत रिव्हॉल्वर दाखवली

सुट्टीवर आलेल्या सैनिकाची दहशत, भर यात्रेत रिव्हॉल्वर दाखवली

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील सापडगावच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र या यात्रेला आलेल्या एका सैनिकाने भर यात्रेतच रिव्हॉल्वर बाहेर काढल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या तक्रारीवरून त्या सैनिकाविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार, सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत नामदेव तिडके असे सैनिकाचे नाव आहे. पोलिसांनी त्या सैनिकाकडून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.

जप्त करण्यात आलेली रिव्हॉल्वर बेकायदेशीरपणे रिव्हॉल्वर बाळगणाऱ्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सैनिक भागवत तिडके हा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील रहिवाशी असून, त्याची नेमणूक झारखंड इथे आहे. मागील आठवड्यात तो गावाकडे आला होता. त्यानंतर तो गुरुवारी रात्री सापडगावच्या यात्रेत फिरण्यासाठी आला असता, रात्री साडेदहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. यात तिडके याने थेट सहा राऊंड असलेली रिव्हॉल्वर बाहेर काढली. त्यामुळे यात्रेत एकच खळबळ उडाली होती. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सैनिकाने रिव्हॉल्वर काढताच यात्रेमध्ये वातावरण तणावग्रस्त झाले होते.

सैनिक तिडके याला बारामुला येथील जिल्हा दंडाधिकारी यांनी संरक्षणासाठी रिव्हॉल्वर बाळगण्याचे लायसन्स दिलं आहे. त्यानुसार त्याने 12 बोअर रिव्हॉल्वर खरेदी केली. मात्र अटीचे उल्लंघन करून यात्रेमध्ये गर्दी,मनोरंजनाच्या ठिकाणी रिव्हॉल्वर लोड करून बाळगले आणि गर्दीच्या ठिकाणी दाखवल्यामुळे सैनिकाविरुद्ध कलम 3/24 भारतीय हत्यार कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रिव्हॉल्वर ज्या कारणामुळे काढली त्या भांडणाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI