भारताने बुद्ध दिला, पण विश्वाच्या संसारासाठी संभाजी महाराजच हवे : संभाजी भिडे

| Updated on: Sep 29, 2019 | 3:58 PM

नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानचं नाव न घेता निशाणा साधला होता. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिल्याचं ते म्हणाले होते. यावरुन संभाजी भिडे यांनी विश्वाचा संसार चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हवे असल्याचं मत व्यक्त केलं.

भारताने बुद्ध दिला, पण विश्वाच्या संसारासाठी संभाजी महाराजच हवे : संभाजी भिडे
Follow us on

मुंबई : भारतानं बुद्ध दिला, पण काय उपयोग झाला. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत. बुद्ध उपयोगाचा नाही, अशा शब्दात ‘शिवप्रतिष्ठान संघटने’च्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide on Narendra Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला विरोध केला. मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत केलेल्या वक्तव्यावरच संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे

नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानचं नाव न घेता निशाणा साधला होता. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिल्याचं ते म्हणाले होते. तसंच भारताने कायमच जगाला एकत्र राहण्याचा आणि शांतीचा संदेश दिला असल्याचंही ते म्हणाले होते.

‘पंतप्रधान मोदी चुकीचं बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो, ते काम आपलं आहे. देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत’ असं संभाजी भिडे (Sambhaji Bhide on Narendra Modi) म्हणाले.

मोदींच्या भाषणानंतर चवताळलेल्या इम्रान खानचा UN मध्ये ‘उन्माद’

नवरात्रौत्सवानिमित्त सांगलीत काढण्यात येणाऱ्या श्री दुर्गामाता दौडमध्ये भिडे यांनी सहभाग घेतला होता. तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी 1982 मध्ये त्यांनी दुर्गामाता दौड सुरु केली होती.


नरेंद्र मोदी काय म्हणाले?

दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एकवटणं ही काळाची गरज आहे. विखुरलेलं जग कुणाच्याही हिताचं नाही. आपल्या सर्वांना संयुक्त राष्ट्राला नवी दिशा द्यावी लागेल, असं मोदींनी सांगितलं. भारताने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिला, असं मोदी म्हणाले.

भिडेंची याआधीची वक्तव्यं

भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धत सुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह सोडला आणि तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असा दावा संभाजी भिडे यांनी केला होता.

कोण आहेत संभाजी भिडे?

भिडे गुरुजी किंवा संभाजी भिडे या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असल्याची माहिती आहे. संभाजी भिडे 85 वर्षांचे असून ते सांगलीत राहतात. त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील सबनीसवाडी आहे.

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप होता.