उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलला

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या तिढा सुटत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर ढकलण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलला

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढच्या आठवड्यात नियोजित केलेला अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या तिढा सुटत नसल्यामुळे दौरा लांबणीवर ढकलण्यात (Uddhav Thackeray Ayodhya Tour) आला आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अयोध्या प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निकालाचं स्वागत केलं होतं. शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना वंदन केल्यानंतर तिथली माती घेऊन 24 नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत जाण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीही उद्धव ठाकरे सहकुटुंब 24 नोव्हेंबरलाच अयोध्येला गेले होते. त्यावेळीही त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरील माती नेली होती.

‘इतकी वर्ष आपण प्रभू रामचंद्र यांच्याविषयीच्या अनेक कथा ऐकत होतो. मात्र, त्यांचा जन्म कोठे झाला होता, होता की नव्हता याच्यावर वाद सुरु होता. तो वाद आता संपला आहे याचा मला नक्कीच आनंद आहे.’ अशा भावना उद्धव ठाकरेंनी अयोध्या निकालानंतर व्यक्त केल्या होत्या.

अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत शिवसेना आग्रही आहे. ‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नाराच उद्धव ठाकरेंनी दिला होता. मात्र आता एनडीएतून शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर होणार, परंतु सरकार ‘महासेनाआघाडी’चे येणार का, हा प्रश्न तिष्ठत आहे.

शिवसेनेचा अयोध्या दौरा

शिवसेनेचा अयोध्या दौरा गेल्या वर्षी चांगलाच गाजला होता. उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही या दौऱ्यावर होते. औरंगाबादचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी तब्बल 4 किलोची चांदीची वीट उद्धव ठाकरेंसोबत अयोध्या दौऱ्यावर आणली होती. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदीर फीर सरकार’ अशी घोषणा देत शिवसैनिक राम मंदिरासाठी अयोध्येत आले होते.

उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध शरयू नदीवर महाआरती झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं.

अयोध्या निकाल काय?

सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Uddhav Thackeray Ayodhya Tour) दिले.

संबंधित बातम्या

शिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकीची तारीख ठरली, महाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI