आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात उरी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 30 पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत आणि अनेक जवान जखमी आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता, की गाड्यांचे तुकडे-तुकडे झाले आहेत. ज्या गाडीचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला, त्या गाडीमध्ये 200 किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती.

हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्यामागे ज्याचा हात असेल त्याला थेट इशारा दिलाय. आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं मोदींनी म्हटलंय. या दुःखाच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देश शहिदांच्या कुटुंबीयांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.

पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेला हा हल्ला घृणास्पद आहे. या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. संपूर्ण देश शहिदांच्या कुटुंबीयांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे दिली.

https://twitter.com/narendramodi/status/1096036001540173825

राजनाथ सिंह जम्मू काश्मीरचा दौरा करणार

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांची उद्याची बिहारमधील रॅली रद्द केली आहे. ते जम्मू काश्मीरला जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शिवाय राष्ट्राय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल स्वतः परिस्थितीचा आढावा घेत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या दहशतवाद्याचा फोटोही जारी करण्यात आलाय. आदिल अहमद दार असं या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्या फोटोवर जैश ए मोहम्मद असं लिहिलेलं आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याचा दावा जैश ए मोहम्मदने केलाय. 2004 नंतर जम्मू-काश्मीरमधला हा पहिलाच आत्मघातकी हल्ला आहे.


Published On - 7:37 pm, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI