विद्या बालनचा डिनरला नकार, रागातून मंत्र्याकडून शूटिंगला आडकाठी, सोशल मीडियावर चर्चा

मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी डिनरसाठी दिलेले निमंत्रण अभिनेत्री विद्या बालनने नाकारल्याची चर्चा आहे

विद्या बालनचा डिनरला नकार, रागातून मंत्र्याकडून शूटिंगला आडकाठी, सोशल मीडियावर चर्चा

इंदौर : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) मध्य प्रदेशातील वनमंत्र्यांनी दिलेले डिनरचे निमंत्रण नाकारल्यामुळे तिच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याच्या चर्चा आहेत. वनमंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी आपणच जेवण पुढे ढकलण्याची विनंती केल्याचा दावा केला आहे. मात्र सोशल मीडियावर यावरुन उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. (Vidya Balan film Sherni shooting reportedly stopped after actress turns down MP minister Vijay Shah dinner invite)

अभिनेत्री विद्या बालन सध्या मध्य प्रदेशात ‘शेरनी’ चित्रपटाचं शूटिंग करत आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत या सिनेमाला चित्रिकरणाची परवानगी मिळाली होती, मात्र काही कारणास्तव त्याला ब्रेक लागला. अशातच मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांच्यासोबत एका कथित वादाची फोडणी याला मिळाली. विजय शाह यांच्यासोबत डिनरचे निमंत्रण विद्या बालनने नाकारल्यामुळे शूटिंगला आडकाठी झाल्याचं बोललं जातं.

नेमकं काय झालं?

विद्या बालन आणि विजय शाह 8 नोव्हेंबरला दुपारी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान भेटणार होते. मात्र शाह यांनी येईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले. विजय शाह शूटिंग स्थळापासून जवळच थांबले होते. तिथेच त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे विजय शाह यांनी विद्या बालनलाही डिनरसाठी निमंत्रित केल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, विद्या बालन गोंदियामध्ये वास्तव्याला होती. शूटिंगपासून तिची राहण्याची जागा जवळपास 40 किलोमीटर दूर होती. त्यामुळे तिने इतका वेळ डिनरसाठी थांबण्यास नकार दिला.

या घटनेला काही दिवस झाल्यानंतर शेरनी टीमच्या क्रूला सेटवर जनरेटर नेण्यास रोखण्यात आलं. नियमांवर बोट ठेवून त्यांची आडकाठी करण्यात आली. डीएफओंनी केलेल्या या कारवाईनंतर मोठा गदारोळ झाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आणि जनरेटरची संख्या कमी केल्यानंतर पुन्हा शूटिंग सुरु झालं.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, वनमंत्र्यांसमवेत डिनर न घेतल्यावरुन निर्माण झालेल्या नाराजीमुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचं बोललं जातं. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही ही गोष्ट लज्जास्पद असल्याची टीका केली. मात्र या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचा दावा शेरनी चित्रपटाचे दिग्दर्शक सय्यद अली आणि विजय शाह यांनी केला.

या दोन्ही घटना स्वतंत्र आहेत. नियम मोडल्यामुळेच शूटिंगला परवानगी मिळाली नाही. मध्य प्रदेश हे शूटिंग हब होत असताना प्रतिमा मलीन करण्याचा डाव चुकीचा आहे, असं सय्यद अली म्हणाले. (Vidya Balan film Sherni shooting reportedly stopped after actress turns down MP minister Vijay Shah dinner invite)

“शूटसाठी परवानगी घेणार्‍यांच्या विनंतीवरुन मी तिथे (बालाघाट) गेलो होतो. त्यांनी मला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाची विनंती केली. मात्र मला आता शक्य नाही, मी महाराष्ट्रात गेल्यावर त्यांना भेटेन, असं मी सांगितलं. डिनर रद्द झाले, शूट नाही” असं स्पष्टीकरण विजय शाह यांनी दिलं.

संबंधित बातम्या :

माझ्यासोबतही दिग्दर्शकाकडून कास्टिंग काऊचचा प्रयत्न, विद्या बालनचा धक्कादायक खुलासा

(Vidya Balan film Sherni shooting reportedly stopped after actress turns down MP minister Vijay Shah dinner invite)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI