Maharashtra Rain | राज्यात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात, प्रत्येकाला सज्ज राहण्याची सूचना : विजय वडेट्टीवार

Maharashtra Rain | राज्यात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात, प्रत्येकाला सज्ज राहण्याची सूचना : विजय वडेट्टीवार

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली (Vijay wadettiwar on Maharashtra Rain).

चेतन पाटील

|

Aug 06, 2020 | 12:23 AM

मुंबई : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या आहेत (Vijay wadettiwar on Maharashtra Rain). त्याचबरोबर प्रत्येक टीमला सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यातील विविध भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कंट्रोल रुमला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली (Vijay wadettiwar on Maharashtra Rain).

“अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कंट्रोल रुममधील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रूझला 65 मिमी तर कुलाब्याला 229 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

“मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. धोक्याची परिस्थिती बघता आतापर्यंत आपण पाच एनडीआरएफचे पथक तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”, असं वडेट्टीवार म्हणाले.

“कोल्हापूरची परिस्थिती धोक्याची आहे, अशी माहिती मिळाली आहे. पंचगंगा नदीचं पाणी दर तासाला एक फुटाने वाढत आहे. पाऊसाचा जोर सुरु राहीला तर पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापुरात होत्या. आता आणखी दोन टीम कोल्हापुरला पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

“रायगडमध्ये महाड, पुणे आणि रोहा येथे कोस्ट गार्डला टीम देण्यात आली आहे. कोल्हापुरच्या शिरोळ, गगनबावडा, हातकणंगले या तालुक्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागात चार एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

“सातारा-सांगली येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्वच भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. फक्त पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे सर्वांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमची टीम नियंत्रण कक्षात बसून सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना करत आहोत”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें