VIDEO: सांगली महापुरातील किंग कोब्राचा व्हिडीओ खोटा

VIDEO: सांगली महापुरातील किंग कोब्राचा व्हिडीओ खोटा

सांगलीत पुराच्या पाण्यात किंग कोब्रा वाहून आल्याचं वृत्त खोटं असल्याचं सिद्ध झालं आहे.  किंग कोब्राचा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झालं आहे. महापुराच्या पाण्याने नागरिकांच्या घरात जे होतं ते सर्वच वाहून नेलं. अशातच सांगलीत एका घरात पुराने चक्क किंग कोब्रा नाग वाहून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Aug 26, 2019 | 12:38 PM

सांगली :  सांगलीत पुराच्या पाण्यात किंग कोब्रा वाहून आल्याचं वृत्त खोटं असल्याचं सिद्ध झालं आहे.  किंग कोब्राचा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झालं आहे. महापुराच्या पाण्याने नागरिकांच्या घरात जे होतं ते सर्वच वाहून नेलं. अशातच सांगलीत एका घरात पुराने चक्क किंग कोब्रा नाग वाहून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित व्हायरल व्हिडीओ सांगलीचा नसून कर्नाटकमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘फॅक्ट क्रेसेंडोने’  केलेल्या तथ्य पडताळणीत याबाबत खुलासा केला आहे.

संबंधित व्हिडीओत एक सर्पमित्र घरात आढळलेल्या किंग कोब्राला घरातून बाहेर ओढत आहे. मात्र, तो कोब्रा इतका मोठा आहे की त्याला ओढणे देखील मुश्किल होताना दिसून येते. दरम्यान, हा कोब्रा सर्पमित्राच्या हातातून सुटका करुन घेण्यासाठी अनेकदा आपला भव्य फणा उभारुन हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. एका प्रयत्नात तर कोब्रा सर्पमित्राच्या अत्यंत जवळ पोहचतो. त्यावेळी या सर्पमित्राला या कोब्राला अक्षरश: हातातून सोडून द्यावे लागते. त्यानंतर पुन्हा तो या कोब्राला पकडून एका कापडी बॅगमध्ये बंद करतो.


किंग कोब्रा नाग हा जगातील लुप्त होत असणाऱ्या दुर्मिळ सापांपैकी एक आहे. हा अत्यंत विषारी नाग प्रामुख्याने भारतातील पूर्व आणि दक्षिण भागात आढळतो. त्यामुळे सांगलीमध्ये किंग कोब्रा आढळू शकत नाही, असं सर्पमित्रांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले  त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी या व्हिडीओची सत्यता लक्षात घेता घाबरण्याचे कारण नाही.

किंग कोब्रा साप कर्नाटकमधील पश्चिम घाट भागात आढळतो. संबंधित व्हिडीओतील साप देखील कर्नाटकमधील चारा (ता. हेब्री, जि. उडपी) नावाच्या गावामध्ये पडकल्याचे व्हिडीओत दिसणाऱ्या सर्पमित्रांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले आहे. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडीओ सांगलीतील नसून कर्नाटकमधील असल्याचे स्पष्ट होते.

(टीप : किंग कोब्राचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीव्ही 9 मराठीने देखील संबंधित व्हिडीओ सांगलीतील असल्याचं सांगणारं वृत्त दिलं होतं. मात्र, फेसबुकच्या फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीनंतर ही बातमी योग्य तथ्यांसह अद्ययावत करण्यात आली आहे.)


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें