नवीन मोटार वाहन कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही, रावतेंची घोषणा

नवीन मोटार वाहन कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही, रावतेंची घोषणा

या कायद्यातील (New motor vehicle act Maharashtra) दंडाची रक्कम भरपूर प्रमाणात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा तटस्थ निर्णय घेतलाय.

सचिन पाटील

| Edited By:

Sep 11, 2019 | 6:53 PM

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेला नवीन मोटार वाहन कायदा (New motor vehicle act Maharashtra) महाराष्ट्रात लागू होणार नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय. या कायद्यातील (New motor vehicle act Maharashtra) दंडाची रक्कम भरपूर प्रमाणात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा तटस्थ निर्णय घेतलाय. या कायद्यातील रक्कम अवाजवी असून ती तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

1 सप्टेंबरपासून नवा कायदा लागू

देशात 1 सप्टेंबर रोजी संशोधित मोटर वाहन कायदा 1988 लागू करण्यात आला. मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करावी यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत होते. अनेकदा हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं, पण या विधेयकातील दंडाच्या तरतुदींना विरोध करत विरोधी पक्षातील खासदारांनी राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ दिलं नाही. पण यावेळच्या अधिवेशनात गडकरींनी हे विधेयक मंजूर करुन घेतलं.

कठोर नियमांची तरतूद

मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास तुरुंगवास

वाहतुकीचे नवे नियम लागू करण्याबाबत विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात घडला, तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येईल.

रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही, किंवा पात्र नसतानाही गाडी चालवली, तर दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक ते दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

नव्या नियमांवर एक नजर

1. विनातिकीट प्रवास केल्यास पाचशे रुपये दंड

2. अधिकाऱ्यांचा आदेश न मानल्यास दोन हजार रुपये दंड

3. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड

4. अपात्र असताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड

5. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड

6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड

7. दारु पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड

8. ओव्हरस्पीड किंवा रेसिंग केल्यास पाच हजार रुपये दंड

9. वाहन परवान्याचे नियम तोडल्यास 25 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

10. वाहनात अतिरिक्त सामान भरल्यास दोन हजार रुपयांहून जास्त दंड

11. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रत्येकामागे एक हजार रुपये दंड

12. सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड

13. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द

14. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द

15. अँब्युलन्स, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपये दंड

16. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास दोन हजार रुपये दंड

17. अल्पवयीन पाल्याने गाडी चालवताना अपघात झाल्यास पालकांना तीन वर्ष तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणीही रद्द

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें