जगात काय घडतंय? चीनमधील वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 45 दिवसानंतर दाम्पत्याला कोरोनाची बाधा

Namrata Patil

|

Updated on: May 11, 2020 | 8:07 AM

कोरोनामुळे जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (World Corona Virus Lockdown Update)

जगात काय घडतंय? चीनमधील वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 45 दिवसानंतर दाम्पत्याला कोरोनाची बाधा

नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा कहर अद्याप (World Corona Virus Lockdown Update) कायम आहे. कोरोनामुळे जगात लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतानाही दिसत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतातही 23 मार्चपासून लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (World Corona Virus Lockdown Update)

1. अमेरिका, स्पेन आणि इटली या फक्त तीन देशात जगभरातले 48 टक्के कोरोनाचे रुग्ण आहेत. या तिन्ही देशांमधल्या कोरोनाबाधितांची संख्या 18 लाखांच्या वर गेली आहे. सध्या हे तिन्ही देश कोरोनाबाधित देशांच्या यादीत अनुक्रम पहिल्या 3 स्थानांवर आहेत.

2. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर स्पेनमध्ये आता मृतांचाही आकडा कमी होऊ लागला आहे. मोठ्या संकटांना तोंड दिल्यानंतर काही दिलासादायक गोष्टी आता स्पेनमध्ये घडत आहेत. सध्या स्पेन कोरोनाच्या यादीत जगातला दुसरा देश आहे.

3. भारताच्या 88 नर्सेसची एक तुकडी दुबईमध्ये मदतीसाठी पोहोचली आहे. दुबईत नर्सेस आणि डॉक्टरांची मोठी कमतरता असल्यामुळे भारतानं सहकार्य म्हणून 88 नर्सेसची एक तुकडी दुबईला रवाना केली आहे.

4. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनीच जागतिक आरोग्य संघटनेला कोरोनाची माहिती उशिरानं देण्याची विनंती केल्याचं वृत्त समोर आलं आहे. एका रिपोर्टमधून ही खळबळजनक बातमी पुढे आली आहे. इतकंच नव्हे तर कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यास विलंब करण्याची सूचना सुद्धा चीननंच केल्याचा दावा करण्यात येत आहे.

5. अमेरिकेत पुन्हा एकदा 24 तासात 25 हजार कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. अमेरिकेतल्या सर्वच्या सर्व म्हणजे 50 राज्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.

6. जगातल्या तब्बल 80 देशांच्या 102 संस्था कोरोनाविरोधी लस बनवण्याच्या कामाला लागल्या आहेत. 100 हून जास्त औषधींवर चाचणी सुरु आहे आणि त्यापैकी 6 देशांनी कोरोनाविरोधातील लस किंवा अँटीबॉडी विकसित केल्याचाही दावा केला आहे. मात्र तरी त्या लसीची अंतिम पडताळणी, लसीचं पेटंट आणि जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता या टप्प्यानंतर लोकांना लसीचा फायदा होऊ शकणार आहे.

7. ज्या वुहानमधून कोरोना पसरला त्याच वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. तब्बल 45 दिवसांनंतर वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. रुग्णांची पत्नी सुद्धा कोरोनाबाधित निघाली आहे.

8. दक्षिण कोरियाची राजधानी सियोल पुन्हा बंद करण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात आणला, म्हणून दक्षिण कोरियाचं जगभर कौतुक झालं होतं. मात्र लॉकडाऊनमध्ये सवलती दिल्यानं पुन्हा त्या ठिकाणी कोरोनानं आपले पाय पसरले आहेत.

9. रशियात आता संसर्गाचा गुणाकार होऊ लागलाय. मॉस्कोसहित एकूण 85 हॉटस्पॉट सरकारनं जाहीर केले आहेत. रशियाची लोकसंख्या 15 कोटींच्या आसपास आहे. मात्र एका माहितीनुसार 1 लाख लोकांमागे रशियात फक्त 28 व्हेंटिलेटर आहेत. त्यातली बहुतांश ही 1990 च्या बनावटीची आहेत. काही दिवसांपूर्वीच ब्वालिदिमीर पुतीन यांनीही रशियात मास्कचा तुटवडा असल्याचं मान्य केलं होतं.

10. दिल्लीत जितके कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यापैकी तब्बल 75 टक्के रुग्णांमध्ये सर्दी, खोकला किंवा ताप अशी कोणतीही लक्षणं नाहीत. तर काहींमध्ये सौम्य लक्षणं असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा सर्दीसारखी लक्षणं असोत किंवा नसोत, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणं हीच सर्वात मोठी खबरदारी आहे.

11. जर्मनीत बर्लिनसह 3 मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनला विरोध केला गेला. लॉकडाऊनऐवजी सरकारनं दुसरे पर्याय निवडण्याची मागणी यावेळी केली गेली. सध्या जर्मनीत 1 लाख 71 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत.

12. ब्रिटनचं सरकार लॉकडाऊनमध्ये सूट देण्याच्या विचारात असलं, तरी ब्रिटनची जनता मात्र लॉकडाऊन हटवण्याच्या विरोधात आहे. एका सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे.  लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेबाबत लोकांची चिंता व्यक्त केली आहे. मात्र लोकांचे जीव सर्वात महत्वाचे असल्यानं त्यांचा लॉकडाऊन कायम ठेवण्याकडे कल आहे.

13. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईकसारखा एखादा हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी वायुदलाची विमानं गस्त घालू लागली आहेत. हंदवाडा एन्काऊंटर आणि जम्मू-काश्मीरमधले दहशतवाद्यांचे हल्ल्यानंतर भारत आक्रमक होऊन उत्तर देईल, अशी भीती पाकिस्तान सरकारला आहे.

14. भारतात दरदिवसाला 95 हजार चाचण्यात होत असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मिळाली आहे. यात 300 हून अधिक सरकारी संस्था आणि 132 खासगी संस्थांमध्ये आतापर्यंत 15 लाखांहून जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत.

15. भारतातून गोळ्या मागवण्याबाबत पाकिस्तानात वाद सुरु झाला आहे. कोरोनाच्या आड पाकिस्तानचं सरकार अगदी साधारण गोळ्यांची सुद्धा आयात करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यात भ्रष्टाचार होण्याची शक्यता तिथल्या विरोधी पक्षानं व्यक्त केली आहे. दरम्यान, अँटिबायोटिक्सबरोबरच इतर अनेक औषधींसाठी पाकिस्तानचं फार्मास्युटिकल इंड्रस्ट्री ही भारतावर अवलंबून आहे.

16. ईस्रायलनं त्यांच्या देशातल्या एका रस्त्याला रविंद्रनाथ टागोर यांचं नाव दिलं आहे. टागोर यांच्या 159 व्या जयंतीनिमित्त ईस्सायलच्या सरकारनं त्यांचा गौरव केला. तेल अवीव शहरातल्या एका रस्त्याला टागोर यांचं नाव देण्यात आलं आहे.

(World Corona Virus Lockdown Update)

संबंधित बातम्या : 

जगात काय घडतंय? : अमेरिकेत भारतीय डॉक्टर्स, नर्सेसना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळण्याची चिन्हं

हे पहिल्यांदा घडतंय : जपानमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांऐवजी चक्क रोबो सहभागी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI