
स्वयंपाकघर हे आपल्या घरातील सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहे. तर आपले स्वयंपाकघर हे फक्त अन्न शिजवण्याचे ठिकाण नाही तर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य तंदुरस्त ठेवण्याचे एक ठिकाण आहे, कारण संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी येथे नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तयार केले जाते. आजही भारतीय घरांमधील बहुतेक महिला त्यांच्या दिवसाची सुरुवात स्वयंपाकघरातील कामापासुन करतात. अशातच तुमचं स्वयंपाकघर लहान असो वा मोठे, तसेच मॉर्डन पद्धतीचं स्वयंपाकघर असो किंवा स्वयंपाकघरात असलेल्या गोष्टी पारंपारिक असतील, परंतु त्यात काम करणे इतके सोपे नाही.
स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापासून ते भांडी साफ करण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात, ज्यात खूप वेळ लागतो आणि कधीकधी अशी समस्या उद्भवते ज्यामुळे स्वयंपाकघरात काम करणे आणखी कठीण वाटते. जर तुम्हाला या छोट्या समस्यांवर उपाय माहित असतील तर स्वयंपाकघरात काम करणे खूप मजेदार बनते. अशातच काही सोप्या हॅक्स तुमच्या या समस्या क्षणार्धात सोडवतील. चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघरातील हे हॅक्स…
डाळीतील पाणी निथळणार नाही
डाळ आणि भात हे आपल्या भारतीय स्वयंपाकघरात रोज शिजणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. म्हणून अनेकांना अशी समस्या असते की डाळ-तांदूळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर पडते. यावर सोपा उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही डाळ किंवा तांदूळ शिजवण्यासाठी ठेवता तेव्हा त्यात थोडेसे स्वयंपाकाचे तेल टाका. कुकरमध्ये स्टीलची वाटी ठेवली तरी डाळ वर येत नाही.
कढई किंवा भांड्या मधील चिकटपणा त्वरित साफ होईल
जर थोडेसे मसालेदार अन्न कढईत किंवा एखाद्या भांड्याच्या तळाशी चिकटले तर संपूर्ण भांडे तासन्तास घासावे लागते. तर हा चिकटपणा त्वरित साफ होण्यासाठी व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घ्या, त्यात बेकिंग सोडा आणि मीठ टाका. आता हे मिश्रण भांड्यावर लावा आणि बाजूला ठेवा. जर तुम्ही ते थोड्या वेळाने स्क्रबरने स्वच्छ केले तर ते त्वरित स्वच्छ होईल.
लसूण लवकर सोलण्याचे हॅक
लसूण सोलण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे कधी कधी घाई घाईत लसूणाचा वापर होतच नाही. यासाठी तुम्ही लसूण आधी गरम पाण्यात टाका थोडा वेळ राहू द्या. त्यानंतर लसूण सालं सहज काढता येतात. याशिवाय, तुम्ही लसूण मायक्रोवेव्हमध्ये 20 ते 25 सेकंद गरम करू शकता, यामुळे लसूण लवकर सोलतो.
भात फुलून येईल
भात अनेकदा खूप ओला किंवा चिकट होत असेल तर तुम्ही त्यात थोडे लिंबाची फोड किंवा थोडे तूप टाकून भात शिजवा. यामुळे भात मऊ होईल. तसेच या प्रक्रियेमुळे चवही दुप्पट होईल. याशिवाय तुम्ही हा ही उपाय अवलंबू शकता की तांदळाच्या प्रमाणापेक्षा दीड पट जास्त पाणी घ्या आणि आता हे पाणी चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ टाकून शिजवा.
या हॅक्सने सुरीची धार लगेच तीक्ष्ण होईल
भाज्या कापण्यापासून ते फळे कापण्यापर्यंत अनेक कामांसाठी स्वयंपाकघरात सुरीची आवश्यकता असते. जर सुरीची धार तीक्ष्ण नसेल तर भाजी कापण्यास अडथळा येतो. यासाठी, सुरीला चांदीच्या फॉइलच्या तुकड्यावर काही वेळ घासून घ्या. त्याच प्रकारे तुम्ही कात्रीची धार देखील धारदार करू शकता.