
श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा काळ, आणि त्यात घेवरसारखी पारंपरिक गोड मिठाई खाल्ल्याशिवाय मजा येत नाही. तीज आणि रक्षाबंधनसारख्या सणांच्या वेळेस बाजारात घेवरची मागणी जोरात वाढते. दिल्ली, जयपूरपासून ते अगदी लहान गावांपर्यंत मिठाईच्या दुकानांमध्ये रंगीबेरंगी आणि मलाईदार घेवर सजलेले दिसतात. पण मागणी वाढली की फसवणूकही वाढते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
अनेक दुकानदार या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी बनावट मावा, कृत्रिम रंग आणि खराब तूप वापरून घेवर बनवतात. अशा मिठाईमुळे अपचन, अॅलर्जी, फूड पॉइझनिंग यासारख्या तब्येतीच्या तक्रारी होऊ शकतात. म्हणूनच, जर तुम्हीही घेवर खाण्याचा विचार करत असाल, तर त्याची शुद्धता ओळखणं गरजेचं आहे.
1. रंगावरून ओळखा
खऱ्या घेवरचा रंग थोडासा पिवळसर किंवा नारिंगीसर असतो. जर घेवर पूर्ण पांढरट किंवा खूपच चमकदार दिसत असेल, तर समजून घ्या की त्यात कृत्रिम रंग वापरले आहेत. असे रंग आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे घेवर खरेदी करताना त्याचा नैसर्गिक रंग आहे की नाही, हे नीट बघा.
2. सुगंध आणि चिकटपणा तपासा
खऱ्या घेवरामध्ये देशी तुपाची खास वास येतो, जो दूरूनच जाणवतो. जर घेवरमधून काही खास वास येत नसेल, किंवा तो हाताला चिकट भासत असेल, तर तो जुना आहे किंवा बनावट पदार्थ वापरून बनवलेला असण्याची शक्यता आहे. अशा घेवरपासून लांब राहणंच शहाणपणाचं.
3. चव आणि कुरकुरीतपणा चाचणी करा
खरा घेवर खाल्ल्यावर त्याची चव सौम्य गोडसर असते आणि पोत थोडा कुरकुरीत असतो. जर घेवर खूपच गोड वाटला किंवा तोंडाला थोडं कडूपणा लागला, तर त्यात काहीतरी गडबड असू शकते. थोडीशी चव घेऊनच त्याची शुद्धता ओळखता येते.
काय कराल?
सणाचा आनंद घ्यायचा असेल, तर गोडधोडातही थोडं डोकं लावायला हवं. घेवरसारखी गोड पारंपरिक मिठाई खायची असेल, तर ती विश्वासार्ह दुकानांतूनच घ्या. शक्य असेल तर घरीच घेवर बनवा यात तुमचं आरोग्यही सुरक्षित राहील आणि घरचं सणाचं वातावरणही तयार होईल.
बाजारात खूप वेगवेगळ्या आकर्षक मिठाया मिळतील, पण त्या दिसायला जितक्या छान असतात, तितक्याच शुद्ध असतीलच असं नाही. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल असं काहीही खाणं टाळा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)