Heart Attack: हिवाळ्यात अशी घ्या तुमच्या हृदयाची काळजी
heart attack in winter : हिवाळ्यात बाहेरचे तापमान कमी झाल्याने नसा आंकुषण पावतात त्यामुळे या ऋतूत हृदयविकाराचा धोका अधिक असतो. हृदयविकाराच्या रुग्णांनी या काळात काळजी घेणे खूप गरजेचे असते. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.

Heart care : हिवाळा ऋतू अनेकांना चांगला वाटतो. या महिन्यात गरमागरम चहा, कॉफी पिणे, भजी खाणे, पर्यटनाला जाणे आवडते. पण हिवाळा सुरु झाला की आरोग्याच्या समस्या ही उद्भवतात. याच काळात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हिवाळा हा हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरतो. त्यामुळे या ऋतूत हृदयाची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊया.
हिवाळ्यात बाहेरचे तापमान आपल्या शरीरापेक्षा कमी असते, त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. शिरा आकसतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे, रक्तदाब वाढतो आणि हृदयाला रक्त पंप करण्यास त्रास होऊ लागतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे रक्त गोठण्याचा धोकाही वाढतो, त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यात अडचण येते. याशिवाय हिवाळ्यात आपली शारीरिक हालचाल लक्षणीयरीत्या कमी होते. व्यायामाच्या अभावामुळे वजन वाढू शकते आणि कोलेस्टेरॉलही वाढू शकते. या दोन्ही घटकांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हृदयविकाराची लक्षणे…
छातीत वेदना किंवा दाब जाणवणे, धाप लागणे, जास्त घाम येणे, छातीत दुखणे जे खांद्यावर किंवा जबड्यापर्यंत पसरते, बेशुद्ध होणे, मळमळ वाटणे ही हृदयविकाराची लक्षणे आहेत.
हिवाळ्यात एकाच ठिकाणी बसून राहू नका. शरिराची हालचाल होणे आवश्यक आहे. काही लोकं शरीराला उबदार ठेवण्यासाठी दारु पिण्याला उत्तम पर्याय समजतात. पण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
हिवाळ्यात सहसा लोकं साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खातात. पण असे करणे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. या कारणास्तव, अन्नातील मीठाचे प्रमाण नियंत्रित करा.
अशी घ्या हृदयाची काळजी
हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, परंतु हृदयावर दबाव पडेल असा व्यायाम करु नये.
हिवाळ्यात योग्य आहार घ्या. ज्यामुळे कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढणार नाही आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहिल.
रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. रक्तदाब वाढताना दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दारू, सिगारेट, तंबाखू अशा व्यसनापासून लांब राहा. कारण हे हृदयासाठी घातक ठरू शकतात.
तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योग आणि ध्यान करा. तणावाचा हृदयावर नकारात्मक परिणाम होत.
अपुरी झोपे ही आरोग्यावर वाईट परिणाम करते. म्हणून, दररोज फक्त 7-8 तास झोपण्याचा प्रयत्न करा.
हिवाळ्यात शरीराचे तापमान राखण्यासाठी उबदार कपडे घाला आणि आपले कान देखील झाका.
हृदयविकार, उच्चरक्तदाब सारख्या समस्या असल्यास डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या.