लोक जास्त पगार मिळवूनही का असतात असमाधानी? समोर आला धक्कादायक रिपोर्ट!
एका संशोधनातून स्पष्ट झालंय की जास्त पगार किंवा मोठी पोस्ट मिळाल्यानं नेहमीच समाधान मिळतं असं नाही. काही नोकऱ्या मानसिक शांतता देतात, तर काही त्रासदायक ठरतात. तुमची नोकरी या यादीत आहे का, आणि तुमच्यासाठी परफेक्ट जॉब कोणता असू शकतो, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

“चांगली नोकरी म्हणजे काय?” कुणाला विचारा, तर उत्तर येईल, “जास्त पगार, मोठी पोस्ट आणि समाजात मान!” पण खरंच एवढंच पुरेसं आहे का? आपण आपल्या दिवसाचा मोठा भाग कामाच्या ठिकाणी घालवतो. जर तिथेच आपल्याला समाधान मिळत नसेल, तर तो पैसा आणि ती प्रतिष्ठा काय कामाची?
नुकताच एस्टोनियातील ‘University of Tartu’ ने एक अभ्यास केला. त्यांनी जवळपास ५९,००० लोक आणि २६३ वेगवेगळ्या नोकऱ्यांचा अभ्यास करून काही धक्कादायक निष्कर्ष काढले. त्यांचा उद्देश होता हे शोधणं की कोणत्या प्रकारच्या कामांमधून लोकांना खरंच आनंद आणि समाधान मिळतं, आणि कोणत्या कामांमध्ये लोक फक्त ‘वेळ ढकलतात’.
संशोधनातून काय समोर आले ?
या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, नोकरीतील समाधान हे केवळ पगारावर अवलंबून नाही. ज्या कामांमधून लोकांना काहीतरी चांगलं केल्याचं, इतरांच्या उपयोगी पडल्याचं किंवा स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरल्याचं समाधान मिळतं, ती लोक जास्त आनंदी असल्याचं दिसून आलं.
कोण आहेत ही लोक ?
1. धार्मिक कार्य करणारे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, तसेच मानसशास्त्रज्ञ आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवणारे शिक्षक हे त्यांच्या कामातून खूप समाधानी असल्याचं आढळलं. लोकांची मदत करण्याची आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी त्यांना समाधान देते.
2. लेखक, कलाकार आणि इतर सर्जनशील काम करणारे लोकही त्यांच्या कामात रमलेले दिसले.
3. काही अनपेक्षित नावंही या यादीत होती, जसं की Ship Engineers आणि Sheet-Metal Workers. कदाचित त्यांच्या कामातील कौशल्य आणि त्यातून मिळणारी ओळख त्यांना समाधान देत असावी.
इथे मिळतो फक्त ‘ताण’? सर्वात कमी आनंदी कोण?
4. हॉटेलमधील किचनमध्ये काम करणारे, वाहतूक क्षेत्रातील अनेक कर्मचारी, फॅक्टरीमधील उत्पादन विभागात काम करणारे, सुरक्षा रक्षक, वेटर आणि पोस्टमन यांसारख्या कामांमध्ये समाधानाची पातळी खूप कमी आढळली. यात अनेकदा शारीरिक कष्ट जास्त असतात, कामाच्या वेळा निश्चित नसतात आणि कामात नावीन्य नसतं.
5. सेल्समधील काही प्रकारच्या नोकऱ्या आणि सुतारकाम करणाऱ्या लोकांमध्येही कामाबद्दलची नाखुशी दिसून आली.
तुमच्यासाठी ‘परफेक्ट जॉब’ कोणता?
हा अभ्यास आपल्याला एक महत्त्वाचा विचार देतो. नोकरी निवडताना फक्त पगार किंवा समाजातील प्रतिष्ठा याकडे न बघता, त्या कामातून आपल्याला खरंच आनंद आणि समाधान मिळतंय का, आपली आवड आणि कौशल्ये तिथे वापरली जात आहेत का, याचाही विचार करायला हवा. कारण शेवटी, आपण आनंदी आणि समाधानी असू, तरच आपल्या कामाचा आणि जीवनाचा खरा अर्थ आहे! तुमची नोकरी तुम्हाला समाधान देते का? विचार करा!
