नॉन-स्टिक भांड्यांमध्ये स्वयंपाक करताय? आजच व्हा सावध… का? घ्या जाणून
नॉन-स्टिक कुकवेअर ही एक सामान्य घरगुती वस्तू आहे. या भांड्यांमध्ये अन्न शिजवण्यासाठी खूप कमी तेल लागतं. अन्न चिकटत नाही, ते धुण्यास सोपं आहे आणि ते आकर्षक देखील दिसतं. परंतू त्याचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. नॉन-स्टिक कुकवेअरमध्ये शिजवणं किती धोकादायक आहे ते जाणून घ्या.

Kitchen Tips : गेल्या काही वर्षांपासून नॉनस्टिक कुकवेअरमध्ये स्वयंपाक करणे हा एक ट्रेंड बनला आहे. नॉनस्टिक कुकवेअर आता घरांमध्ये एक सामान्य वस्तू आहे. या भांड्यांमध्ये तेल देखील कमी लागतं चिकटल्याशिवाय कमी तेलात अन्न शिजवतं. या कुकवेअरवर पॉलीटेट्राफ्लुरोइथिलीन (PTFE) चे धातूचं आवरण असतं. ज्यामुळे अन्न भांड्याला चिटकत नाही. हेच कारण आहे की लोक नॉनस्टिक कुकवेअर निवडत आहेत.
नॉन-स्टिक भांड्यांचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. असा दावाही करण्यात आला आहे की नॉन-स्टिक भांड्यांमध्ये शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. नॉन-स्टिक भांड्यांमध्ये स्वयंपाक करणं आरोग्यासाठी हानिकारक का आहे आणि त्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. याशिवाय, नॉन-स्टिक भांडं वापरताना कोणती खबरदारी घ्यावी.
नॉन-स्टिक कुकवेअर हानिकारक का आहे?: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी एक मार्गदर्शक तत्व जारी केली आहे, ज्यामध्ये त्यांना नॉन-स्टिक कुकवेअरमध्ये अन्न शिजवू नये असा सल्ला देण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे की जर तुम्ही नॉन-स्टिक भांड्यांमध्ये जास्त वेळ अन्न शिजवलं तर त्यात असलेलं टेफ्लॉन शरीरात प्रवेश करतं.
यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. नॉन-स्टिक भांड्यांमध्ये पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीनचा लेप असतो, ज्याला टेफ्लॉन असंही म्हणतात. जेव्हा कुकवेअर उच्च तापमानाला गरम केलं जातं तेव्हा टेफ्लॉनमधील रसायने बाहेर पडतात आणि अन्नात मिसळतात. यामुळे वंध्यत्व आणि हृदयाचे आरोग्य तसेच लोहाची कमतरता यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही नॉनस्टिक पॅन, भांडी वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचे आहे. नेहमी प्रतिष्ठित ब्रँडचे नॉनस्टिक पॅन खरेदी करा. नॉनस्टिक पॅनसाठी लाकडी किंवा सिलिकॉन चमचे वापरा. स्टीलच्या चमच्याने लेप निघून जातो, ज्यामुळे तो अधिक धोकादायक बनतो. जर लेप झिजला असेल तर पॅन बदलणं चांगलं.