लडाख फिरायला जायचंय? मग IRCTC चा ‘हा’ टूर पॅकेज नक्की बघा
तुमचं मन लडाखसारख्या थंड, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचं आहे का? तर मग IRCTC तुमच्यासाठी खास टूर पॅकेज घेऊन आलं आहे. यात काय आहे खास आणि कशी कराल बुकिंग, जाणून घ्या सविस्तर

गर्दी, गोंधळ आणि रोजच्या धावपळीच्या जीवनातून काही दिवस शांततेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्याची इच्छा अनेकांना असते. थंड हवामान, स्वच्छ आकाश, बर्फाच्छादित डोंगर आणि सुंदर दर्या पाहण्यासाठी लडाखसारख्या ठिकाणाचा विचार केला जातो. आता IRCTC ने अशाच एक खास ट्रिपची योजना आणली आहे, जी तुमची ही इच्छा पूर्ण करू शकते.
IRCTC चं ‘Magnificent Ladakh’ पॅकेज
IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) ने ‘Magnificent Ladakh’ नावाचा खास टूर पॅकेज जाहीर केला आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला 6 रात्री आणि 7 दिवस लडाखमधील सर्वात सुंदर ठिकाणं दाखवली जातील. यामध्ये लेह, शाम व्हॅली, नुब्रा व्हॅली, तुर्तुक आणि पॅंगॉन्ग लेक यांसारखी लोकप्रिय ठिकाणं समाविष्ट आहेत.
हा टूर 16 जुलैपासून सुरू होणार असून, सुरुवात बेंगळुरूहून फ्लाइटने होणार आहे. या संपूर्ण टूरमध्ये तुम्हाला एसी बसद्वारे प्रवास, उत्तम हॉटेलमध्ये राहण्याची सोय, स्थानिक प्रवासासाठी गाड्या, जेवण, इंश्योरन्स आणि इतर मूलभूत सुविधा दिल्या जातील. म्हणजेच, तुम्हाला फक्त बॅग भरायची आहे आणि लडाखच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे!
खर्चाची रचना?
या पॅकेजमध्ये खर्चाची रचना खालील प्रमाणे आहे:
1. जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल, तर प्रति व्यक्ती ₹63,200 लागतील.
2. जर कपल प्रवास करत असाल, तर प्रति व्यक्ती ₹58,350 खर्च येईल.
3. जर तीघेजण एकत्र जात असाल, तर प्रत्येकासाठी ₹57,950 एवढं भाडं आकारलं जाईल.
ही किंमत लडाखच्या सर्व प्रमुख ठिकाणांचा समावेश करणाऱ्या फ्लाइट आणि बस टूरसाठी अगदी वाजवी मानली जाते. या टूरमध्ये आरामदायक प्रवास, स्थानिक चवीनुसार जेवण, आणि सुंदर निवासस्थान ही सगळी व्यवस्था समाविष्ट आहे.
बुकिंग कसं कराल?
IRCTC च्या या पॅकेजसाठी बुकिंग प्रक्रिया खूपच सोपी आहे. तुम्ही www.irctctourism.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन टूर बुक करू शकता. तसेच, जवळच्या IRCTC च्या पर्यटन कार्यालयात जाऊनही बुकिंग करता येईल. अधिक माहितीसाठी अधिकृत एजंटशी संपर्क करणेही शक्य आहे.
निसर्ग, शांतता आणि साहस एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल, तर ‘Magnificent Ladakh’ टूर पॅकेज तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे!
