प्लास्टिक की मेटल? कोणता कूलर तुमच्यासाठी योग्य…जाणून घ्या?

उन्हाळ्याचा तडाखा वाढलाय, AC परवडत नाही आणि घरात हवंय थंडगार वातावरण? मग स्वस्तात मस्त असा एअर कूलर हाच आपला मित्र! पण बाजारात गेल्यावर प्लास्टिकचा कूलर घ्यावा की तो जुना, मजबूत लोखंडी कूलर, या विचारात तुम्हीही पडता ना? दोन्हीच्या किमतीत फरक, दिसण्यात फरक, मग आपल्या घरासाठी आणि गरजेसाठी नक्की कोणता योग्य? चला, समजून घेऊया

प्लास्टिक की मेटल? कोणता कूलर तुमच्यासाठी योग्य...जाणून घ्या?
Air Cooler
| Edited By: | Updated on: May 16, 2025 | 12:32 AM

उन्हाळ्याचा उकाडा वाढू लागला की घरात थंडावा निर्माण करण्यासाठी कूलर हा अनेकांचा पहिला पर्याय असतो. एसी महाग आणि विजेचा खर्चही जास्त, त्यामुळे कमी बजेटमध्ये थंड हवा मिळवायची असेल, तर कूलर हे एक सुटसुटीत उत्तर आहे. पण बाजारात शेकडो मॉडेल्स पाहून खरी अडचण होते ती म्हणजे प्लास्टिक बॉडीचा कूलर घ्यावा की मेटल बॉडीचा?

या दोन्ही कूलरचे वेगवेगळे फायदे आणि मर्यादा आहेत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी आपल्या गरजा आणि घराची रचना लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे.

प्लास्टिक कूलर : आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये हलकाफुलका आणि स्टायलिश दिसणारा प्लास्टिक बॉडी कूलर अनेकांना आकर्षित करतो. याचं वजन कमी असल्यामुळे हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज हलवता येतो. शिवाय, प्लास्टिकवर गंज लागत नाही, त्यामुळे याला फारशी देखभाल लागते नाही.

प्लास्टिक कूलर कधी निवडावा?

1. लहान फ्लॅट्स, अपार्टमेंट्ससाठी

2. जिथे जागेची कमतरता आहे

3. कमी आवाज आणि सोपी हाताळणी हवी असेल

4. वारंवार कूलरची जागा बदलायची गरज असेल

मेटल बॉडीचे कूलर : हे जुन्या पिढीपासून आजपर्यंत टिकून आहेत, याचं कारण म्हणजे त्यांची प्रभावी कुलिंग क्षमता. हे कूलर मोठ्या खोल्यांमध्ये अधिक चांगले काम करतात. यांचं फॅन आणि बॉडीही मजबूत असते, त्यामुळे त्यांचं आयुष्य तुलनेने जास्त असतं. मात्र, गंज लागू नये म्हणून वेळोवेळी स्वच्छता आणि काळजी घ्यावी लागते.

मेटल बॉडीचा कूलर कधी निवडावा?

1. मोठी रूम, हॉल किंवा ऑफिससाठी

2. दमदार हवा आणि जास्त थंडावा हवा असल्यास

3. थोडा आवाज चालेल, पण टिकाऊपणा हवा असेल

4. विजेचा थोडा अधिक वापर चालणार असेल

जर तुम्हाला हलकासा, स्टायलिश आणि कमी देखभाल लागणारा पर्याय हवा असेल, तर प्लास्टिक कूलर निवडा.
पण जर तुम्हाला थोडा जास्त थंडावा, जास्त कूलिंग पॉवर आणि टिकाव हवा असेल, तर मेटल कूलर हा सर्वोत्तम पर्याय आहे.