घरात कपडे वाळवताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी
घरात कपडे वाळवणं ही गरजेची गोष्ट आहे, पण ती करताना योग्य खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.त्यामुळे पुढच्यावेळी घरात कपडे वाळवत असाल, तर या टिप्स लक्षात ठेवा आणि स्वतःचं व आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवा.

पावसाळा असो किंवा थंडीचा हंगाम, घरातच कपडे वाळवणं ही अनेकांची रोजची सवय असते. पण तुम्हाला माहितेय का की हीच सवय कधी कधी आरोग्यासाठी घातक ठरू शकते? होय, घराच्या आत कपडे वाळवताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर त्यातून बुरशी, जीवाणू आणि दम्यांसारख्या श्वसनविकारांचा धोका वाढतो. चला जाणून घेऊया घरात कपडे वाळवताना कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि काय आहेत हे धोके.
घरात कपडे वाळवताना ‘व्हेंटिलेशन’ अत्यावश्यक
सर्वप्रथम, कपडे घरात वाळवत असाल तर खोलीत योग्य हवा खेळती असणे अत्यंत आवश्यक आहे. बंद खिडक्या आणि दरवाजे असलेल्या खोलीत कपड्यांतील ओलावा बाहेर निघत नाही. यामुळे हवेतील आर्द्रता वाढते आणि हीच गोष्ट बुरशी आणि जीवाणू वाढण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे कपडे वाळवत असताना खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि शक्य असल्यास पंखा लावावा.
डीह्यूमिडिफायरचा वापर करा
घरातल्या वातावरणातील ओलावा कमी करण्यासाठी तुम्ही डीह्यूमिडिफायरचा वापर करू शकता. हे उपकरण हवेतील आर्द्रता कमी करतं आणि बुरशीच्या वाढीला आळा घालतो. खासकरून बंद खोली किंवा व्हेंटिलेशन कमी असलेल्या जागांमध्ये हे अत्यंत उपयोगी ठरतं.
वारा खेळता येईल अशी खोली निवडा
कपडे वाळवण्यासाठी अशी खोली निवडा जिथे हवा सहजपणे खेळू शकेल. बाथरूममध्ये जर पंखा असेल किंवा एग्झॉस्ट फॅन असेल तर ती जागाही चांगली ठरू शकते. तसेच, घरात अशा जागा शोधा जिथे थेट सूर्यप्रकाश येतो, जेणेकरून कपडे लवकर वाळतील आणि ओलसरपणामुळे बुरशी वाढणार नाही.
ड्राय रॅक किंवा दोरीचा वापर करा
कपडे एका जागी ढिगाने टाकण्याऐवजी, त्यांना योग्य प्रकारे टांगणे आवश्यक आहे. घरात ड्राय रॅक किंवा कपडे वाळवण्यासाठी खास दोरी असावी. यामुळे कपड्यांमध्ये हवेला जागा मिळते आणि ते लवकर व समप्रमाणात वाळतात.
कपडे नीट निचोळा
कपडे टांगण्याआधी त्यातील अतिरिक्त पाणी शक्य तितकं निचोळून टाका. त्यामुळे कपडे लवकर वाळतात आणि हवेमधील ओलावा कमी होतो. वॉशिंग मशीन वापरत असाल तर ‘स्पिन मोड’ अधिक वेळासाठी वापरणं उपयुक्त ठरू शकतं.
का आहे ही खबरदारी गरजेची?
ओलसर कपडे बंद घरात वाळवले गेले, तर हवेत सतत ओलावा राहतो. यामुळे श्वसनाच्या आजारांना आमंत्रण मिळतं. विशेषतः ज्यांना अॅलर्जी, अस्थमा किंवा सायनसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरते. तसेच बुरशी वाढल्यास घराच्या भिंतीवर डाग पडतात आणि दुर्गंधीही येऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
