
मुलांचं मन हे एक कोरं पाटीप्रमाणे असतं जसं त्यावर लिहिलं जातं, तसं ते आयुष्यभर टिकून राहतं. लहानग्यांचं भावविश्व अतिशय कोमल आणि संवेदनशील असतं. त्यामुळे पालकांनी त्यांच्याशी बोलताना अतिशय जपून आणि समजूतदारपणाने संवाद साधणं आवश्यक असतं. अनेकदा आपण अनाहूतपणे काही कठोर किंवा तुलना करणाऱ्या गोष्टी बोलतो, ज्या त्या मुलांच्या मनात खोलवर घर करून बसतात. त्या विसरणं त्यांना मोठं झाल्यावरही कठीण जातं. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता किंवा भावनिक असुरक्षितता निर्माण होऊ शकते. म्हणूनच, या आर्टीकलमध्ये आपण पाहणार आहोत अशा 5 गोष्टी ज्या पालकांनी कधीच आपल्या मुलांशी बोलू नयेत.
आत्मविश्वासाच्या मुळावर घाव
मुलांना कमी लेखणं, त्यांच्या क्षमतेवर शंका घेणं हे त्यांना पूर्णपणे तोडून टाकू शकतं. “तू काही कामाचा नाहीस” किंवा “तू कधीच काही करू शकत नाहीस” अशी भाषा त्यांचा आत्मविश्वास संपवते. त्याऐवजी पालकांनी “तू प्रयत्न कर, तू नक्की करू शकतोस” अशा प्रोत्साहक शब्दांचा वापर करायला हवा.
इतरांशी तुलना
“पाहा शेजारचा अमोल किती हुशार आहे”, “तुझी बहीण किती नीटनेटकी आहे” अशा तुलनात्मक विधानांमुळे मुलांच्या मनात अपयशाची आणि हेवाची भावना निर्माण होते. प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यामुळे तुलना न करता त्याच्या खासियतांवर भर द्यावा.
भावनांना दाबणं
“अजून रडतोस? मुलगा आहेस की मुलगी?” अशा वाक्यांनी आपण मुलांना शिकवतो की दुःख, राग, भीती व्यक्त करणं चुकीचं आहे. यामुळे मूल मोठं झाल्यावरही भावना दाबत राहतं. त्याऐवजी पालकांनी “मला माहिती आहे, तू दुःखी आहेस. ते ठीक आहे.” असं समजावून सांगावं.
प्रेमाच्या बदल्यात अटी
“जर तू हे केलं नाहीस, तर आई तुझ्याशी बोलणार नाही” अशा धमक्या प्रेमावर अटी लादतात. यामुळे मूल असुरक्षिततेच्या भावनेने जगू लागतं. पालकांनी आपल्या प्रेमात अटी नसल्याचं सतत सांगितलं पाहिजे. “तू काही केलंस तरी आई-बाबांचं प्रेम तुझ्यावर कायम आहे” हे मुलाला जाणवायला हवं.
चुका दाखवून दुखावणं
मुलांच्या चुका सतत उगाळून ताशेरे मारणं त्यांच्या guilt ची भावना वाढवू शकतं. “तू नेहमी चुकतोस” किंवा “तुझं काही बिघडलंच आहे” असं म्हणणं टाळा. त्याऐवजी, “ही चूक झाली, पण आपण पुढच्यावेळी चांगलं करू” अशा शब्दांनी मुलांना सुधारण्यास प्रेरणा द्या.
मुलं आपले प्रतिबिंब असतात. आपण जसं त्यांच्याशी वागतो, बोलतो – त्यावर त्यांच्या भावी आयुष्याचं व्यक्तिमत्त्व उभं राहतं. म्हणून, शब्दांमध्ये मृदुता आणि प्रोत्साहन असणं फार महत्त्वाचं आहे. भावनिक जखमांपेक्षा प्रेम आणि विश्वास यांच्या आधारे वाढवलेली मुलं अधिक आत्मविश्वासी, संवेदनशील आणि यशस्वी ठरतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)