चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ 5 सोपे उपाय करा ट्राय
तुमचे चांदीचे दागिने काळे झाले असतील तर तुम्ही ते सहज स्वच्छ करू शकता. कारण हवेतील ओलावा आणि घामामुळे चांदीच्या दागिन्यांवर काळेपणा येऊ लागतो. पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही ते घरी नवीनसारखे चमकू शकता. चला तर या सोप्या टिप्सबद्दल जाणून घेऊयात...

प्रत्येक स्त्रीला तिचे दागिने खूप महत्वाचे असतात. मग तो दागिना सोन्याचा असो वा चांदीचा. प्रत्येक महिलेच्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये चांदीचे दागिने असतातच. मात्र कालांतराने हवा, ओलावा आणि घामाच्या संपर्कात आल्याने व नीट काळजी न घेतल्याने हे चांदीचे दागिने थोडेसे फिकट किंवा काळपट दिसू लागतात. पण आता तुम्ही घरच्या घरी काही सोप्या घरगुती उपायांनी तुमचे मौल्यवान चांदीचे दागिने नवीनसारखे चमकू शकता. चांदीचे दागिने स्वच्छ करण्याच्या काही सोप्या आहेत ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात.
बेकिंग सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइल
चांदीच्या दागिन्यांवरील खोल डाग साफ करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यासाठी एका भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल पसरवा. फॉइलची चमकदार बाजू वरच्या दिशेने ठेवा. यानंतर, त्यावर तुमची चांदीची वस्तू ठेवा आणि आता त्यात बेकिंग सोडा आणि मीठ टाका. नंतर त्यावर गरम पाणी टाका आणि झाकून थोडावेळ ठेऊन द्या. ५-१० मिनिटांनी तुमचे दागिने पाण्यातून काढा व स्वच्छ पाण्याने धुवा आणि मऊ कापडाने पुसून टाका जेणेकरून ते चमकतील.
टूथपेस्टचा वापर
टूथपेस्ट दागिन्यांवरील हलके डाग काढून टाकण्यासाठी उत्तम आहे. प्रथम एक मऊ टूथब्रश किंवा कापड घ्या. त्यावर थोडा साधा पांढरा टूथपेस्ट घ्या. जेल टूथपेस्ट वापरू नका. आता चांदीच्या दागिन्यांवर टूथब्रशच्या साहाय्याने टूथपेस्ट सर्व बाजूनी लावून घ्या, थोड्यावेळाने दागिने पाण्यातून स्वच्छ धुवून काढा आणि कोरड्या कापडाने पुसून चमकवा. दागिने जास्त घासू नयेत याची काळजी घ्या.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
हे मिश्रण एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट म्हणून देखील काम करते. प्रथम एका भांड्यात 1/2 कप व्हिनेगर घ्या आणि त्यात 2 टेबलस्पून बेकिंग सोडा मिक्स करा. तुमच्या चांदीच्या वस्तू या मिश्रणात 2-3 तास भिजवा. आता हे दागिने काढून स्वच्छ पाण्याने धुवा आणि सुकवा.
दही किंवा मलईने साफ करणे
नाजूक आणि पॉलिश केलेल्या दागिन्यांसाठी ही पद्धत चांगली आहे. तुमच्या चांदीच्या वस्तूला थोडे दही किंवा मलई लावून सुमारे 5-10 मिनिटे भिजवा. मऊ टूथब्रशने हलके ब्रश करा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडाने पुसून टाका. अशाने काही मिनिटात दागिने चमकदार दिसतील.
काही महत्वाच्या टिप्स
- नाजूक दागिने – जर तुमचे दागिने मोती, कोरल, ओपल किंवा इतर नाजूक स्टोन ने जडवलेले असतील तर त्यांच्यावर थेट या पद्धती वापरून पाहू नका. प्रथम एका लहान भागावर टेस्ट करून पाहा.
- घासू नका – दागिने स्वच्छ करताना ते जोरात घासू नका, कारण यामुळे दागिन्यावर लाईन्स येऊ शकतात,
- कोरडे ठेवा – दागिने स्वच्छ केल्यानंतर नेहमी चांगले कोरडे करा जेणेकरून ओलावा राहणार नाही.
- ठेवण्याची योग्य पद्धत: चांदीचे दागिने नेहमी हवाबंद पिशवीत किंवा मऊ कापडात गुंडाळून ठेवा. यामुळे हवेच्या संपर्कात आल्याने होणारा काळेपणा कमी होईल.
- नियमित स्वच्छता – वापरल्यानंतर कोमट पाणी आणि सौम्य साबणाने धुवा आणि कोरडे करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
