फिट आलेल्या रुग्णाला पाणी का देऊ नये? प्रथमोपचार काय करावे? जाणून घ्या
एपिलिप्सी किंवा मिरगी हा मेंदूचा आजार आहे, ज्यात असामान्य विद्युत तरंग निर्माण होतात, ज्यामुळे झटके येतात. प्रथमोपचारात रुग्णाला सुरक्षित ठिकाणी झोपवणे आणि रुग्णालयात नेणे समाविष्ट आहे. नियमित औषधे आणि शस्त्रक्रिया यांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.

एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित एक आजार आहे. ज्याला सामान्य भाषेत फिट येणं, आकडी येणे किंवा मिरगी येणे असे म्हटले जाते. ही एक प्रकारची न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य विद्युत तरंग निर्माण होतात आणि त्यामुळे रुग्णाला झटके येतात. तो जमिनीवर कोसळतो आणि काही काळासाठी बेशुद्ध होतो. पण फिट नेमकी कशामुळे येते, यामागची कारणं काय आहेत, याची लक्षणे नेमकी काय असतात, फिट आल्यानंतर काय करावे याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत.
सर्वसाधारणपणे दहापैकी एका व्यक्तीला फिट येते. मात्र फिट येण्याची ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. यातील पहिले कारण म्हणजे ही समस्या आनुवंशिक असू शकते. तसेच काही वेळा रुग्णांच्या मेंदूला एखादा संसर्ग झालेला असू शकतो. त्यासोबतच वारंवार आणि गंभीर प्रमाणात डोकं दुखणं हे देखील यामागील कारण असू शकते. मेंदूतील रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे आणि मेंदूमध्ये गाठ असण्यामुळेही फिट येऊ शकते.
फिट येण्याची लक्षणे काय?
- स्नायू एकदम घट्ट आणि कडक होणे, त्यानंतर झटके येऊ लागणे.
- दातखिळी बसणे
- ओठ चावणे
- अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळणे
- तोंडातून फेस येणे
- कपड्यांमध्ये लघवी होणे
- डोळे फिरवणे
फिट आल्यास काय करावे?
- जेव्हा एखाद्या व्यक्तीला फिट येते, तेव्हा शांत राहणे आणि योग्य प्रथमोपचार देणे महत्त्वाचे असते.
- फिट आलेल्या रुग्णाला लगेचच डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपवावे. यामुळे त्याच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडतो. श्वासनलिकेत अडकणार नाही.
- रुग्णाच्या डोक्याखाली मऊ उशी किंवा घडी केलेला कपडा ठेवा. रुग्णाला इजा पोहोचतील, अशा वस्तू त्याच्या आजूबाजूला असल्यास त्या दूर करा.
- जर रुग्णाने घट्ट कपडे घातले असतील, तर ते सैल करा. विशेषतः गळ्याभोवतीचे कपडे सैल करावे.
- रुग्णाला काहीही खायला किंवा प्यायला देऊ नका, कारण फिट आल्यावर तो पूर्ण शुद्धीत नसतो. अशावेळी अन्न आणि पाणी श्वासनलिकेत जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे ते गुदमरण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णाचे तोंड उघडण्यासाठी चमचा किंवा इतर कोणतीही वस्तू घालण्याचा प्रयत्न करू नका.
- साधारणपणे फिट दोन ते तीन मिनिटे राहते आणि त्यानंतर व्यक्ती झोपून जातो. मात्र, जर फिट पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.
- फिट आल्यावर अनेकदा व्यक्तीच्या तोंडात एखादा गोळा किंवा काही तरी धरायला दिले जाते. पण ते देऊ नये, कारण त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येऊ शकते आणि तो व्यक्ती गुदमरण्याची शक्यता असते.
फिटबद्दल समज आणि गैरसमज
फिटबद्दल समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. हे समजून घेणे आवश्यक आहे की, फिट येण्यावर वेळीच निदान आणि उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. 70 टक्के प्रकरणांमध्ये नियमित औषधोपचार घेतल्याने रुग्ण या आजारांवर नियंत्रण मिळवू शकले आहेत. तर ३० टक्के रुग्णांना औषधांपेक्षा फिटसाठी शस्त्रक्रिया करणे फायदेशीर ठरते. योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचाराने फिट येणाऱ्या व्यक्ती निरोगी आणि सामान्य जीवन जगता येते. यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.