‘नूरजहां’ आणि ‘कोहिनूर’ आंब्यांची जबरदस्त क्रेझ; जाणून घ्या का आहेत हे आंबे इतके महाग?
भारत हा फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याच्या दुर्मिळ आणि महागड्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ‘नूरजहां’ आणि ‘कोहिनूर’ या जातींचा विशेष उल्लेख होतो. पण नेमकं काय आहे या आंब्यांचे वैशिष्ट्य आणि ते इतके महाग का असतात? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

भारतात आंब्यांचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत, पण काही आंबे इतके खास आहेत की त्यांची किंमत एकदम हजार रुपयांपासून सुरू होते. यामध्ये दोन आंब्यांचे प्रकार सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहेत ‘नूरजहां’ आणि ‘कोहितूर’. हे दोघंही भारतातील सगळ्यात महागडे आंबे मानले जातात आणि त्यांची चव जितकी खास आहे, तितकीच त्यांची कहाणीही अद्वितीय आहे.
नूरजहां
‘नूरजहां’ नावाचं हे खास आंब्याचं जातीचं नाव मुघल राणी नूरजहांच्या नावावरून पडलं आहे. हा आंबा मध्य भारतात उगम पावतो, विशेषतः झऱ्यांनी आणि दमट हवामानाने प्रसिद्ध असलेल्या एका भागात. इथलं हवामान आणि माती या फळासाठी अतिशय योग्य मानली जाते. असं सांगितलं जातं की हा आंबा मूळचा अफगाणिस्तानातून गुजरातमार्गे भारतात आला होता, पण आज त्याचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन फक्त या भागातच होतं. स्थानिक शेतकरीही असं म्हणतात की तेच या फळाचे एकमेव उत्पादक आहेत.
हा आंबा केवळ चवीलाच नव्हे, तर आकारातही भव्य असतो. एका नूरजहां आंब्याचं वजन 2.5 ते 3.5 किलोपर्यंत असतं आणि त्याची लांबी जवळपास एक फूट असते. विशेष म्हणजे या झाडांची उंची फारशी नसते फक्त 12 फूटपर्यंतच वाढतात. त्यामुळे झाडांना फळांचा भार सहन करण्यासाठी आधार देणे आवश्यक असते.
वर्षाच्या सुरुवातीलाच होतो बुकींग
नूरजहांचा पुरवठा फारच मर्यादित असल्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांतच याचं बुकींग सुरू होतं. चव, वजन आणि दुर्मिळतेमुळे याच्या किंमतीही चांगल्याच वाढतात एका आंब्याची किंमत 1000 रुपयांपर्यंत जाते. काही वर्षांपूर्वी नूरजहां ही जात जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होती, पण राज्य सरकारने घेतलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना याच्या शेतीसाठी प्रोत्साहन मिळालं आणि ही जात पुन्हा उगम पावली.
कोहिनूर
‘कोहिनूर’ नावाचा हा आंबा पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक मुर्शिदाबाद भागात उगम पावतो. हे गाव पूर्वी नवाबांची राजधानी होती आणि आजही त्याच्या संस्कृतीत नवाबी शाहीपणा दिसतो. कोहितूर हे नाव ‘कोह-ए-नूर’ या प्रसिद्ध हिऱ्याच्या नावावरून पडलं आहे आणि त्याला ‘फळांचा हिरा’ मानलं जातं. 18व्या शतकात, नवाब सिराजुद्दौला यांच्यासाठी खास हकीम अदा मोहम्मदी नावाच्या बागायतदाराने हा आंबा तयार केला होता. त्या काळात केवळ राजघराणे आणि श्रीमंत व्यापारीच याचा आस्वाद घेऊ शकत होते.
अतिशय नाजूक आणि खास प्रकार
कोहितूरची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची नाजूकता. हा आंबा इतका नाजूक असतो की मुर्शिदाबादपासून कोलकातापर्यंतचा प्रवास करताना सुद्धा त्याची चव बदलते, असं मानलं जातं. त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून झाडावर बोर्यांचे थांब लटकवले जातात आणि ट्रान्सपोर्ट करताना कापसात गुंडाळून नेलं जातं. तो इतका खास आहे की, तो कापतानाही लाकडी सुरीचा वापर केला जातो, धातूचा नव्हे. याची किंमत प्रत्येक आंब्याची 1500 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न
आज कोहितूर फारच थोड्या बागांमध्ये उगम पावतो. त्यामुळे याला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने याच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी या आंब्याला GI (Geographical Indication) टॅग देण्याची प्रक्रिया सुरू आहे, जेणेकरून याची ओळख जपत शेती वाढवता येईल.
थोडक्यात सांगायचं तर, ‘नूरजहां’ आणि ‘कोहितूर’ हे फक्त आंबे नाहीत, ते इतिहास, परंपरा आणि खास चव यांचं प्रतीक आहेत. ज्या लोकांनी एकदाही हे आंबे चाखलेत, त्यांच्यासाठी हा अनुभव विसरणं अशक्य आहे. आणि म्हणूनच हे आंबे भारतातले सगळ्यात महागडे समजले जातात.
