नारळ पाणी पिणं कोणी टाळावे? नारळ पाणी पिण्यापूर्वी काय तपासणे गरजेचे? जाणून घ्या
साधारणपणे, नारळ पाणी सर्वांसाठी फायदेशीर असते असे मानले जाते. मात्र, काही विशिष्ट लोकांसाठी नारळ पाणी पिणे हानिकारकही ठरू शकते. चला, कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळावे, हे जाणून घेऊया.

नारळ पाणी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि नैसर्गिक पेय मानले जाते. ते शरीराला ‘हायड्रेटेड’ ठेवते, इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पूर्ण करते आणि पचनसंस्थेचे कार्य सुधारते. अनेकदा आपण बाजारात किंवा प्रवासात सहजपणे नारळ पाणी पितो, कारण ते सर्वांसाठी आरोग्यदायी असल्याचे मानले जाते. तथापि, हे पूर्णपणे सत्य नाही. काही विशिष्ट लोकांसाठी नारळ पाणी पिणे अत्यंत हानिकारक ठरू शकते आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते. कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळावे
कमी रक्तदाब असलेले रुग्ण
नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे. मात्र, ज्या लोकांचा रक्तदाब आधीच कमी असतो, त्यांच्यासाठी नारळ पाणी नुकसानदायक ठरू शकते. कमी बीपी असलेल्या रुग्णांनी जास्त नारळ पाणी प्यायल्यास त्यांचा बीपी आणखी खाली येऊ शकतो. अशा स्थितीत चक्कर येणे, थकवा, अस्पष्ट दिसणे किंवा बेशुद्ध पडणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
किडनीचे आजार असलेले रुग्ण
किडनीचे मुख्य कार्य शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त खनिजे (Extra Minerals) बाहेर काढणे हे असते. जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करत नसते, तेव्हा शरीरात पोटॅशियमची पातळी वाढू शकते. नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे, ते प्यायल्यास किडनीच्या रुग्णांच्या शरीरातील पोटॅशियमचे संतुलन बिघडू शकते. यामुळे हृदयाची धडधड अनियमित होणे, स्नायूंची कमजोरी आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
मधुमेहाचे रुग्ण
नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी चवीला हलकी गोड असते. प्रक्रिया केलेल्या साखरेपेक्षा ती नक्कीच चांगली असली तरी, मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन सावधगिरीने आणि कमी प्रमाणात केले पाहिजे. दिवसातून 1 कपपेक्षा जास्त नारळ पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे साखरेवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. जर तुम्ही इन्सुलिन किंवा इतर औषधे घेत असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नारळ पाणी पिऊ नका.
ॲलर्जी असलेले लोक
प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. काही लोकांना नारळाची किंवा नारळापासून बनवलेल्या उत्पादनांची ॲलर्जी असू शकते. अशा परिस्थितीत नारळ पाणी प्यायल्यास त्यांच्या शरीरात ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते. यामुळे त्वचेवर लालसर पुरळ, खाज सुटणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा उलट्या होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, जर तुम्हाला नारळाची कोणतीही ॲलर्जी असेल, तर नारळ पाणी पिणे टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर
अनेकदा डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर काही पदार्थ खाण्या-पिण्यास मनाई करतात, जेणेकरून औषधे आणि शरीराच्या नैसर्गिक क्रियांमध्ये अडथळा येऊ नये. नारळ पाणी रक्तदाब कमी करणारे पेय असल्यामुळे, शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो, ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी किमान दोन आठवडे आणि शस्त्रक्रियेनंतर काही काळ नारळ पाणी पिणे टाळावे.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
