
महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. महापालिका निवडणूक निकाल लागल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून महापौर पदासाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात जरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला देखील स्पष्ट बहुमत मिळवता आलेलं नाहीये. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये हीच परिस्थिती आहे. स्पष्ट बहुमत नसल्यानं भाजपला देखील आता महापालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी भाजपला शिवसेना शिंदे गट पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये देखील हीच स्थिती आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आमचे जास्त नगरसेवक निवडून आले म्हणून आम्हीच मोठे भाऊ म्हणत शिवसेना शिंदे गटाकडून या महापालिकेच्या महापौर पदावर दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आमचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं आमचाच महापौर होईल असं भाजपनं म्हटलं आहे. हा सर्व गोंधळ सुरू असाताच मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक हे नॉट रिचेबल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक कोकण विभागीय कार्यालयात दाखल झाले. मात्र 11 पैकी 7 च नगरसेवक या ठिकाणी आले असून, चार नगरसेवक नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यातील दोन नगरसेवक हे काही वेळात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दिली आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वरून सरदेसाई देखील उपस्थित आहेत.
तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील भाजपाची हीच स्थिती पहायला मिळत आहे, मुंबईमध्ये भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या, मात्र तरी देखील त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही, त्यामुळे तिथे देखील भाजपला शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. त्यामुळे या महापालिकेत कोणाचा महापौर होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.