मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप? शिवसेना शिंदे गट, ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये खलबतं, वेगवान घडामोडी…
महापालिका निवडणूक निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मात्र तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला महापौर पदासाठी आपल्या मित्र पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपनं राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर दुसऱ्या क्रमाकांवर शिवसेना शिंदे गट आहे, दरम्यान भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमधील नगरसेवकांचं संख्याबळ असं आहे की तिथे जर भाजपला आपला महापौर बसवायचा असेल तर त्यांना तिथे मित्र पक्षाची गरज लागणार आहे. मित्र पक्षानं पाठिंबा दिला तरच त्या महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होऊ शकतो. दरम्यान मुंबईमध्ये देखील हीच स्थिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मुंबई महापालिकेत भाजपचे तब्बल 89 नगरसेवक निवडून आले. मात्र तरी देखील भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर राहिला. मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे आता मुंबईत जर सत्ता मिळवायची असेल तर भाजपला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे.
हीच स्थिती कमी अधिक फरकानं काही महापालिकांमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये देखील अशिच स्थिती आहे. कोल्हापूरमध्ये 37 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र काँग्रेसला बहुमत मिळवता आलं नाही, तर दुसरीकडे भाजपचे या महापालिकेत 27 नगरसेवक निवडून आले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 15 त्यामुळे इथे देखील भाजपला पाठिंब्याची गरज लागणार आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांची भेट घेतली आहे, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, दरम्यान ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी देखील या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ही भेट शरद पटील यांच्या घरी झाली आहे. या भेटीमध्ये वैयक्तिक चर्चा झाल्याची माहिती शरद पाटील यांनी दिली आहे. मात्र ठाकरे गटाचे दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याने त्याविषयी देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
