जामनेरमध्ये रुग्णालयाचा ऑक्सिजन संपल्याने 11 रुग्ण गुदमरले, एकाचा मृत्यू

जामनेरमध्ये रुग्णालयाचा ऑक्सिजन संपल्याने 11 रुग्ण गुदमरले, एकाचा मृत्यू

जामनेर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन संपल्याने 11 रुग्णांना तातडीने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या दरम्यान एका रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला (A patient dies at Jamner government Hospital in Jalgaon due to oxygen shortage)

चेतन पाटील

|

Apr 16, 2021 | 7:51 PM

जळगाव : राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असाच सुरु राहिला तर अनेक रुग्णांचा हकनाक बळी जाईल, अशी भीती अनेक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याबाबत चर्चा सुरु असतानाच ज्या गोष्टीची भीती होती अगदी तीच घटना जळगावात घडली आहे. जळगावच्या जामनेर ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन संपल्याने 11 रुग्णांना तातडीने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. या दरम्यान एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (patient dies at Jamner government Hospital in Jalgaon due to oxygen shortage).

संतप्त नातेवाईकांकडून संताप व्यक्त

जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आज (शुक्रवारी) ऑक्सिजनचा साठा संपल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजनचा साठा संपल्याने ऑक्सिजन प्रणालीवर असणाऱ्या 12 रुग्णांना तातडीने जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. या प्रक्रियेत रुग्णालयात पोहचण्याआधीच एका कोरोनाबाधित वृद्धेचा रस्त्यात रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत वृद्धेच्या संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. या घटनेमुळे वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा किती हतबल झाली आहे, याचा प्रत्यय आला.

35 ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता असताना फक्त 20 ते 25 सिलिंडरचाच पुरवठा 

जळगाव जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. काल (गुरुवारी) मुक्ताईनगरात ऑक्सिजनचा तुटवडा होता. तर, आज जामनेरातही हेच चित्र दिसले. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात 52 बेडची व्यवस्था आहे. त्यापैकी 18 ऑक्सिजनचे बेड आहेत. सर्व बेड फुल्ल असून दररोज तब्बल 35 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत आहे. असे असताना दररोज केवळ 20 ते 25 सिलिंडरचाच पुरवठा होत आहे. त्यामुळे दिवसा 12 व रात्री 10 सिलिंडर अशाप्रकारे ऑक्सिजन पुरवून रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाचा सुरू आहे (patient dies at Jamner government Hospital in Jalgaon due to oxygen shortage).

नालासोपाऱ्यातही दहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

चार दिवसांपूर्वी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नालासोपारा शहरातही अशीच काहीशी घटना घडल्याचं समोर आलं होतं. नालासोपाऱ्यात दोन रुग्णालयांमध्ये तब्बल दहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये सात तर रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये तीन रुग्णांचा अवघ्या काही तासातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आज जळगावात याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

ठाण्यात ऑक्सिजनचा साठा संपल्याने 26 रुग्णांना हलवले

नालासोपाऱ्यातील घटनेआधी ठाण्यात रविवारी (11 जानेवारी) ऑक्सिजनचा साठा संपल्याने तब्बल 26 रुग्णांना पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटरमधून ग्लोबल हॉस्पिटलला हलवण्यात आलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्याच्या याच कोविड सेंटरमध्ये चार दिवसांपूर्वी  काही तास रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड सेंटरमध्ये बाथरुम आणि शौचालयासाठी देखील पाणी नसल्याची माहिती समोर आली होती.

संपूर्ण राज्यात रुग्णांची हेळसांड

राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. दररोज अर्ध्या लाखापेक्षा जास्त नागरीक कोरोनाबाधित होत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना साधा बेड मिळवण्यासाठी चार ते पाच दिवस वाट बघावी लागत आहे. काही ठिकाणी एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार द्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी जमीनीवर रुग्णांना झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. काही भागांमध्ये प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचाच साठा कमी पडत आहे. त्यामुळे अक्षरक्ष: रुग्णांचा जीव जाताना दिसतोय. या घटना ऐकल्यावर अंगावर काट येतो. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा असाच वाढता राहीला तर यापेक्षाही आणखी विदारक परिस्थितीत उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

जळगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावलं

दरम्यान, जळगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 14 एप्रिलपासून ब्रेक दि चेन मोहिमेंतर्गत कडक निर्बंध घातले आहेत. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध आहेत. मात्र, असे असताना काही नागरिक रात्रीच्या वेळी ठोस कारण नसताना घराबाहेर फिरतात. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वतीने सरप्राईज अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात दीड हजार जणांच्या सरप्राईज अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे, त्यात 73 जण पॉझिटिक आढळले आहेत. पारोळा आणि बोदवडमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह आढळले.

राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून इतर बाबींवर कडक निर्बंध घातले आहेत. असे असले तरी काही नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर फिरत आहेत. पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने अशा लोकांच्या रस्त्यावरच अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रमुख शहरांत ही कारवाई सुरू आहे. शहरांमधील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून रस्त्यावर फिरणान्या लोकांच्या अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

हेही वाचा : ‘जो बायडन सर, कळकळीची विनंती, लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवा’, अदर पुनावाला यांचे अमेरिकेच्या अध्यक्षांना विनवण्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें