“शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपवाल्यांना वेगळा कायदा…” संजय राऊतांची सणसणीत चपराक
आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांचे विधानसभेतून निलंबन झाले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपवर शिवरायांच्या अपमानाबाबत दोन वेगळे कायदे असल्याचा आरोप केला.

समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावरुन एक वादग्रस्त विधान केले होते. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य त्यांनी केले होते. यावरुन विधीमंडळात मोठा गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षांनी यावर घोषणाबाजी करत अबू आझमींना कोंडीत पकडले. त्यानंतर अबू आझमी यांच्याविरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमी यांचे सध्या सुरु असलेल्या अधिवेशनातून निलंबन करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपला रोखठोक सवालही केला आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अबू आझमींवर कारवाई झाल्याने कौतुक केले आहे. त्यासोबत एक जोरदार चपराकही लगावली आहे. “शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपवाल्यांना वेगळा कायदा आहे काय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
संजय राऊतांचे ट्वीट काय?
“अबू आझमी वर कारवाई झाली ! एकदम कडक! मस्त! पण छत्रपती शिवाजी राजाना माफीवीर म्हणणाऱ्या या अतीशहाण्या भाजपा खासदारावर गुन्हा दाखल करुन अटक का झाली नाही? अजूनही वेळ गेलेली नाही! कोरटकर, सोलापुरकर, आणि या सुधांशू त्रिवेदी सारख्याना देखील आझमी चा न्याय का नाही? शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपा वाल्याना वेगळा कायदा आहे काय?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
अबू आझमी वर कारवाई झाली ! एकदम कडक! मस्त! पण छत्रपती शिवाजी राजाना माफीवीर म्हणणाऱ्या या अतीशहाण्या भाजपा खासदारावर गुन्हा दाखल करुन अटक का झालीनाही? अजूनही वेळ गेलेली नाही! कोरटकर, सोलापुरकर, आणि या सुधांशू त्रिवेदी सारख्याना देखील आझमी चा न्याय का नाही? शिवरायांचा अपमान… https://t.co/jGiGENPsoi
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2025
अबू आझमी नेमकं काय म्हणाले होते?
सध्या चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती, असे अबू आझमींनी म्हटले होते.
