आता फिनिक्ससारखं राखेतून उठण्याची वेळ, रविना टंडन, प्राजक्ता माळीने केलं नारीशक्ती वंदन अधिनियमाचे स्वागत!

काली चंडीचं रुप आपल्याला महिलांच्या एअरफोर्स, सैन्यात दिसतंय. काही महिला या बाहेर जातात. मेहनत करतात पैसे कमवतात. त्या सगळ्या लक्ष्मी आहेत. पंतप्रधान यांनी नारीशक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून आम्हाला ती शक्ती दिली आहे, असं रविना टंडन म्हणाली.

आता फिनिक्ससारखं राखेतून उठण्याची वेळ, रविना टंडन, प्राजक्ता माळीने केलं नारीशक्ती वंदन अधिनियमाचे स्वागत!
PRAJAKTA MALI AND RAVEENA TANDON
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2026 | 9:00 PM

Nari Shakti Vandan : नारीशक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्वपक्षीय भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या विधेयकासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे. नारी शक्ती विचार मंच या सामाजिक संस्थेकडून ‘नारी शक्ती महिला संमेलन’ आयोजित करण्यत आले होते. या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी बॉलिवुडची दिग्गज अभिनेत्री रविना टंडन आणि मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनीदेखील हजेरी लावली. या दोन्ही अभिनेत्रींनी नारीशक्ती वंदन विधेयकाचे कौतुक केले. फॅशन डिझायनर अर्चना कोचर यांची देखील संमेलनास उपस्थित होत्या.

काही देशात महिलांना कोणतेही अधिकार मिळत नाहीत

या कार्यक्रमात रविना टंडनने भाषण केले. भाषणात बोलताना भारत महिलांच्या हक्कासाठी सर्वात चांगला देश आहे. काही देशात महिलांना कोणतेही अधिकार मिळत नाहीत. केंद्र सरकार आणि पंतप्रधानांमुळे हे शक्य झाले. मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनी हे सगळं करुन दाखवलं आहे, अशा भावना रविनाने नारीशक्ती वंदन विधेयकाबाबत व्यक्त केल्या.

आजचे सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते

काली चंडीचं रुप आपल्याला महिलांच्या एअरफोर्स, सैन्यात दिसतंय. काही महिला या बाहेर जातात. मेहनत करतात पैसे कमवतात. त्या सगळ्या लक्ष्मी आहेत. पंतप्रधान यांनी नारीशक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून आम्हाला ती शक्ती दिली आहे. ज्यामुळे आपण संसदेतदेखील आपला आवाज उठवू शकतो. आजचे सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते. आता आपण संसदेत जाऊ शकतो. मी किरण बेदींची मोठी फॅन आहे. आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेत होते. आज महिला एअरफोर्समध्ये जाऊ शकतात. सैन्यात जाऊ शकतात. माझी पण आयएएस होण्याची इच्छा होती, अशा भावना यावेळी रविनाने व्यक्त केल्या.

आता राखेतून फिनिक्ससारखं उभं राहिलं पाहिजे

तसेच प्राजक्ता माळीनदेखील नारीशक्ती वंदन विधेयकाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. नारीशक्ती वंदन विधेयकाला समर्थन देण्यासाठी आपण इथे आलो आहोत. मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जन्मले. या विधेयकासाठी भगिरथ प्रयत्न होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन, असे प्राजक्ता माळी म्हणाली. काही वर्षांआधी महिलांचे मोठे हाल होते. मात्र, आता महिलांना पुढे आणण्यासाठी काही वर्षात अनेक योजना आणि अनेक प्रयत्न झाले आहेत. उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी आपण झटले पाहिजे. आपण आता राखेतून फिनिक्ससारखं उभं राहिलं पाहिजे.
महिलांना आपण देवी मानतो, मात्र घरी जातो, कामावर असतो तेव्हा हे आपण विसरतो. आपण महिलांवर दबाव आणतो, टिकाटिप्पणी करतो, टोमणे मारतो यातून महिलांचं खच्चीकरण होतं असं मला वाटतं, असे मतही प्राजक्ता माळीने व्यक्त केले.

 

Follow Us